कोपरगाव – तालुक्यातील भोजडे येथे चोरांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेख कुटुंबीयांची आ. आशुतोष काळे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. मागील आठवड्यात भोजडे येथील रहिवासी सर्फउद्दीन शेख यांच्या घरात चोरट्यांनी चोरी केली. घराशेजारी झोपलेल्या शेख यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेत चोरट्यांनी त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती.
आमदार काळे परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करण्यासाठी कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागात गेले असताना या कुटुंबांची त्यांनी आवर्जून भेट घेतली. कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून तपासाबाबतची माहिती जाणून घेतली. घटनेतील आरोपींना लवकरात लवकर गजाआड करा, अशा सूचना दिल्या. जखमी झालेल्या शानूरबी हुसेन शेख यांनी चोरट्यांशी दोन हात केल्याने काळे यांनी त्यांच्या धाडसाचे कौतुक केले.
यावेळी तालुका जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, विक्रम सिनगर, फारूख पटेल, बाळासाहेब मंचरे, भोजडेचे सरपंच दत्तू सिनगर, धोंडिराम पवार, नामदेव बोराडे, सर्फउद्दीन शेख उपस्थित होते.