आ. शशिकांत शिंदे यांना घेरण्याची भाजपची रणनीती

संदीप राक्षे
कोरेगाव मतदारसंघावर शिवसेनेचीही दावेदारी; कॉंग्रेस हद्दपार होण्याचा धोका

सातारा  – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आ. शशिकांत शिंदे व भाजपचे महेश शिंदे यांच्यात राजकीय “टसल’ सुरू झाली आहे. तालुक्‍यात मरगळलेल्या कॉंग्रेसला स्थानिक राजकारणातून हद्दपार होण्याची भीती आहे. शिवसेनेत नव्याने दाखल झालेले किशोर बाचल, दत्ताजीराव बर्गे यांच्या वाढत्या महत्त्वाकांक्षा आणि रणजितसिंह भोसले यांनी केलेली दावेदारी यामुळे पेच वाढला आहे. शिवसेनेच्या पारंपरिक मतदारसंघावर चंद्रकांत पाटील यांनी “महेशास्त्र’ रोखल्याने वाईप्रमाणेच येथेही युतीचे संबंध ताणले गेले आहेत.

शेतकरी संघटनांच्या आघाडीकडून सह्याद्री बॅंकेचे चेअरमन पुरुषोत्तम जाधव यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीतून शशिकांत शिंदे यांच्याविरोधात तगड्या व्यूहरचनेला प्रारंभ झाल्याने आ. शिंदे यांची दमछाक होण्याची चिन्हे आहेत. देशात आणि राज्यात भक्‍कमपणे रुजलेले भाजपचे कमळही दिवसेंदिवस फुलू लागले असताना, कधी काळी पहिल्या क्रमांकावर असलेली कॉंग्रेस सध्या अस्तित्व गमावून बसली आहे. दुसरीकडे उदासीन पदाधिकाऱ्यांमुळे शिवसेनेत मरगळ आली होती; परंती नितीन बानुगडे-पाटील यांनी स्वतः लक्ष लागून डागडुजी हातात घेतली आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय हालचालींमुळे शशिकांत शिंदे यांच्यासाठी धोक्‍याची घंटा वाजत आहे.

शिवसेनेने परजली स्वबळाची शस्त्रे
कोरेगाव तालुक्‍यात पूर्वी थोडेफार अस्तित्व असलेली शिवसेना नावापुरता उरली आहे. पंचायत समिती सदस्य मालोजी भोसले वगळता इतर पदाधिकारी बोर्डावर नाव लावण्यापुरते उरले आहेत. याही परिस्थितीत विधानसभेसाठी शिवसेनेने स्वबळाची शस्त्रे परजायला सुरुवात केली आहे. दत्ताजीराव बर्गे, किशोर बाचल व रणजितसिंह भोसले यांच्यापैकी उमेदवार कोण, याचे उत्तर मुंबईत “मातोश्री’वर मिळणार आहे.

कोरेगाव विधानसभा मतदारसंघात माजी आमदार शंकरराव जगताप यांनी पंचवीस वर्षे कॉंग्रेसची धुरा संभाळली होती. त्यांच्या काळात कॉंग्रेस कायम प्रथम क्रमांकावर होता. शरद पवार यांनी कॉंग्रेसशी फारकत घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली. त्यांच्या पक्षाने उमेदवारी दिलेल्या शालिनीताई पाटील यांनी शंकरराव जगताप यांचा मोठ्या मताधिक्‍याने पराभव करून या मतदारसंघात राष्ट्रवादीचे अस्तित्व वाढवले. राष्ट्रवादीकडून दोन वेळा आमदार झालेल्या शालिनीताईंना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी आर्थिक निकषांवर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत शरद पवार यांच्या विरोधातच भूमिका घेतली होती. त्यामुळे पक्षात ताईंबद्दल नाराजी पसरली होती. त्यात 2009 मध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची रचना बदलली.

या मतदारसंघात कोरेगावबरोबर सातारा व खटाव तालुक्‍यांच्या काही भागांचा समावेश झाला तर पूर्वीचा जावळी मतदारसंघ रद्द होऊन सातारा विधानसभा मतदारसंघाशी जोडला गेला. त्यामुळे साताऱ्याचे तत्कालीन आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या सोयीसाठी राष्ट्रवादीने शशिकांत शिंदे यांना जावळीतून कोरेगावात “शिफ्ट’ केले. शालिनीताई पाटील यांच्याविरोधात कोरेगाव तालुक्‍यातील कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्यावी, असा सूर पक्षात होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून शशिकांत शिंदे यांनाच पक्षाने उमेदवारी दिली. शिंदे यांनीही कार्यकर्त्यांची मोट बांधून शालिनीताई पाटील यांचा मोठ्या मताधिक्‍याने पराभव केला होता.

त्यानंतर आ. शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात पंचतारांकित औद्योगिक वसाहत, वैद्यकीय. अभियांत्रिकी महाविद्यालये, जिहे-कठापूर, वसना-वांगना उपसा सिंचन योजना पूर्ण करणार, मोठी गावे “स्मार्ट’ बनवणार, भुयारी गटार योजना करणार, अशी अनेक आश्‍वासने गेल्या दहा वर्षांत दिली; परंतु एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे मतदारसंघातील राष्ट्रवादीचा एक मोठा गट आ. शिंदे यांच्या विरोधात असून स्थानिक कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी करत आहे. आ. शिंदे यांच्या विरोधात जाणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांची संख्या वाढत आहे. स्वाभिमानी विचारमंचचे सुनील खत्री व कार्यकर्त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याचा महेश शिंदे यांना कितपत फायदा होणार आणि शशिकांत शिंदे यांना कितपत तोटा होणार, याची उत्तरे प्रत्यक्ष निवडणुकीत मिळतील.

कॉंग्रेसची मरगळ जाईना
कोरेगाव तालुक्‍यात चाळीस वर्षे वर्चस्व गाजवणारी कॉंग्रेस अंतर्गत गटबाजीमुळे संपुष्टात येत आहे. शंकरराव जगताप यांच्यानंतर कोरेगाव तालुक्‍यात कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. आनंदराव पाटील व आ. जयकुमार गोरे समर्थकांचे दोन गट पडले. दोन्ही गटांनी एकमेकांना संपविण्याच्या नादात पंचायत समितीतील पक्षाची चाळीस वर्षांची सत्ता गमावली. पंचायत समितीच्या अवघ्या दोन व जिल्हा परिषदेची अवघी एक जागा कॉंग्रेसला मिळाली.

ग्रामपंचायत निवडणुकांकडे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पूर्ण दुर्लक्ष केले. किरण बर्गे व विजयराव कणसे यांची भूमिका स्पष्ट नसल्याने कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. एवढी वाताहत होऊनही कॉंग्रेसचे नेते व कार्यकर्ते मरगळ झटकून कामाला लागलेले नाहीत. याचा फायदा उठवत पुढे भाजपच्या महेश शिंदे यांनी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरत ग्रामपंचायत निवडणुका लढवल्या. खेड-नांदगिरी, हिवरे, जांब खुर्द अशा मोठ्या ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकवला. मतदारसंघात भाजपचे काम जोमात असल्याने निवडणुकीत भविष्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांची डोकेदुखीचे वाढणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)