या चिमण्यांनो परत फिरा…

शहरातील चिमण्यांची संख्या रोडावली

पिंपरी -“एक घास चिऊचा…एक घास काऊचा’ अशा प्रकारे लहानपणापासूनच ओळख झालेल्या चिमण्या दिवसेंदिवस कमी होत चालल्या आहेत. शहरातील पर्यावरण असंतुलित होत असून याचे पणिाम आता शहरातील जैवविविधतेवर होऊ लागला आहे. शहरातील पक्ष्यांचे प्रमाण कमी होत असून चिमण्यांची संख्याही कमी होऊ लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील निसर्गप्रेमी संस्था तसेच पर्यावरण व पक्षी मित्र प्रयत्न करत आहेत. परंतु या कामी नागरिकांचे सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा शहरातील पर्यावरण मित्र करत आहेत.

आज जागतिक चिमणी दिन. पर्यावरणात व मानवी जीवनात चिमणीचे अनन्य साधारण महत्व आहे. एक घास चिऊचा व एक घास काउचा, असे बोबडे बोलतच आपली चिउताईशी सर्वात पहिल्यांदा ओळख करुन दिली जाते. लोकवस्तीतच राहणाऱ्या चिमण्या आता दूर होऊ लागल्या आहेत. शहरात चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. शहरातील पर्यावरणप्रेमी व पक्षीमित्र यासाठी प्रयत्नशील असून स्पाईनरोड परीसरात तसेच दत्तगड परिसरात मागील वर्षी पक्ष्यांसाठी देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. पिंपरी चिंचवडमधील बऱ्याच सोसायटीमध्ये तसेच घरांमध्ये देखील आपल्या लाडक्‍या चिउताईसाठी रोजच पाणी व धान्याची कटोरी ठेवण्यात येत आहेत.

ठिकठिकाणी विविध क्षेत्रातील पर्यावरणप्रेमी एकत्र येउन चिमणी व इतर पक्ष्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अधिवास तयार करण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करत आहेत. अनेक स्वयंसेवी संस्थानी पुढाकार घेऊन चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी तयार केली आहेत. जागतिक चिमणी दिनानिमित्त शहरातील पर्यावरणमित्रांनी चिमण्यांचा नैसर्गिक अधिवास तयार करण्याचा संकल्प केला असून शहरवासीयांना चिमणी संवर्धऩाचे आवाहन केले आहे. या वर्षी चिमणी दिनानिमित्त आपल्या घराच्या किंवा ऑफिसजवळ मोकळ्या जागेत खिडकी मध्ये पाणी व धान्य ठेवावे. पक्ष्यांना शिजविलेले अन्न देऊ नये, असे आवाहन केले आहे. हाउस स्पॅरो, पीतकंठ किंवा रान चिमणी, यांचे प्रमाण सध्या कमी झाले आहे. नैसर्गिक दाना व चाऱ्याअभावी शहरात चिमण्यांचे प्रमाण खूपच कमी झाल्याचे पक्षीप्रेमींचे म्हणणे आहे.

आहार बदलला
नागरिक आपल्या खिडक्‍यांमध्ये पक्ष्यांसाठी अन्न ठेवतात. परंतु हे अन्न पक्ष्यांचे नैसर्गिक अन्न नसते. घरात रात्री उरलेल्या चपात्यांचे तुकडे, भात, भाजी पक्ष्यांना खाऊ घातली जात आहे. वाढत्या शहरीकरणामुळे पक्ष्यांचे नैसर्गिक खाद्य उरलेले नाही. मनुष्याचे अन्न पक्षी पोट भरण्यासाठी नाइलाजास्तव खात आहेत. परंतु यामुळे त्यांच्या आयुर्मानावर आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. कालांतराने आता पक्ष्यांच्या आहाराच्या सवयी देखील मनुष्याने बदलल्या आहेत.

का घटल्या चिमण्या ?
विविध विकासकामांमुळे शहरात वृक्षांची होणारी कत्तल, देशी झाडे कमी होऊन विदेशी झाडांची संख्या वाढली आहे. विदेशी वृक्षांवर पक्षी आपले घरटे बांधत नाहीत. मोबाइल टॉवर यामुळे चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. तसेच उंच इमारती आणि विजेच्या दिव्यांच्या उंच खांबांमुळे रात्रीसुद्धा असणारा प्रकाश पक्ष्यांच्या रात्री विश्रामात व्यत्यय निर्माण करत आहेत.

पक्ष्यांची घरटी आणि भांडीही चोरली
पर्यावरण संतुलनासाठी पक्षी वाचविण्यासाठी परिसरातील उपलब्ध जागेत देशी वृक्षांची लागवड करुन त्या ठिकाणी चिमणी व इतर पक्ष्यांसाठी घरटी तसेच पाणवठयाची जागा तयार करण्यात येत आहेत. दत्तगडावर दर रविवारी पर्यावरणप्रेमी पर्यावरण संवर्धनाचे काम करतात. मात्र काही नागरिकांकडून त्यांच्या प्रयत्नांना खोडा घातला जात आहे. स्पाईन रोड परिसरात मागील वर्षी चिमण्यांसाठी व विविध पक्ष्यांसाठी खास घरटी करुन लावण्यात आली होती. परंतु काही काळानंतर भुरट्यांनी ही घरटी व पक्ष्यांच्या दाण्यासाठी ठेवण्यात आलेली भांडीही चोरुन नेली. नागरिकांनी देखील सहकार्य केल्यास भविष्यात चिमणी आपले अस्तित्व टिकवू शकेल तसेच पर्यावरण संतुलन राखले जाईल, अशी अपेक्षा पक्षीमित्रांनी व्यक्त केली आहे.

शहरातील पर्यावरण प्रेमी तसेच निसर्ग मित्र, पक्षीप्रेमी म्हणून सर्वांनी एकत्रित प्रयत्न सुरु केले आहेत. मागील वर्षी आम्ही स्पाईन रोड परीसरात तसेच दत्तगडावर वृक्षलागवड व पक्ष्यासाठी तसेच दाणापाण्याची व्यवस्था केली होती. चिमण्या व इतर पक्ष्यासाठी निवारा म्हणून घरटी बनवून झाडांवर लावण्यात आली होती. त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे परीसरातील चिमण्यांचे प्रमाण वाढले होते. असे प्रयत्न सर्वच स्तरातून होणे आवश्‍यक आहे. तरच चिमणी हा पक्षी टिकेल व पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल.
– प्रशांत राउळ, पक्षी प्रेमी

Leave A Reply

Your email address will not be published.