या आणि पार्सल घेऊन जा…

पुणे  – अस्सल खवय्यांच्या जिभेला लॉकडाऊनमुळे “लॉक’ लागले होते. ते आता हॉटेल व्यावसायिकांनी “पार्सल’च्या स्वरूपात उघडले आहे. हॉटेल उघडून ग्राहकांना खिलवण्यापेक्षा त्यांना ठराविक मेन्यू पार्सलद्वारे उपलब्ध करून देण्याला व्यावसायिकांनी सुरूवात केली आहे.

पुणे ही जशी शिक्षणनगरी, आयटी नगरी आहे तशी ती खवय्यांचीही नगरी आहे. खाऊ गल्लीपासून ते परंपरेने आणि खानदानीपणाने सुरू असलेल्या काही स्पेशालिटी “प्रभा बटाटेवडा’ किंवा “मिसळ’सारख्या मेन्यू असलेल्या हॉटेल्सना अनेकजण “मिस’ करत होते. त्या सेवा आता हळूहळू पूर्ववत होत आहेत.

अद्यापही जमावबंदीमुळे काही कामानिमित्तच लोक बाहेर पडत आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना व्यवसायाच्या ठिकाणी ग्राहकांना बसून खानपान सेवा देता येणार नाही. त्यामुळे काहींनी पदार्थ थेट घरपोच देण्याचीही व्यवस्था केली आहे. काहींनी सोशल मीडियावरच “टॅगलाइन’ टाकून प्रसिद्धी सुरू केली आहे. यात त्यांनी “स्वच्छतेची योग्य ती काळजी घेतली जाईल’ याची हमीही सोशल मीडियातून त्यांनी दिली आहे.

प्रसिद्ध हॉटेल्सचीही पार्सलसेवा
नॉनव्हेजसाठी फेमस असलेल्या ‘आबाचा ढाबा’नेही घरपोच सेवेशिवाय हॉटेलमध्ये पार्सल देण्याची सोय केली आहे. फर्गसन रस्त्यावर फेमस असलेल्या “चैतन्य पराठा हाऊस’नी देखील “टेक अवे’ असे बोर्ड सोशल मिडियावर फिरवले आहेत, तर फर्गसन रस्त्यावरील आणखी एक प्रसिद्ध हॉटेल “वैशाली’ ने ही पार्सलची व्यवस्था केली आहे. टिळक रस्त्यावरील “गिरिजा’ हॉटेलनेही आपल्या सर्व शाखांमध्ये लिमिटेड स्वरूपात पार्सल देण्याला सुरूवात केली आहे. थालीपीठ, पुलाव, पावभाजी अशा स्वरूपातील “स्नॅक्‍स’सारखा मेन्यू त्यांनी पुरवण्याला सुरूवात केली आहे. याशिवाय थाळीसाठी फेमस असलेल्या टिळक रस्त्यावरीलच “दुर्वांकूर’नेही पार्सल देण्याची व्यवस्था केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.