पाथर्डी – शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आ. मोनिका राजीव राजळे या 14 हजार 294 मतांनी विजयी झाल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार ऍड. प्रताप ढाकणे यांनी कडवी झुंज दिली. मात्र पाथर्डी तालुक्यातून अपेक्षित मताधिक्य न मिळाल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
शेवगाव तहसील कार्यालयात सकाळी आठ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी देवदत्त केकाण यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात झाली. शेवगाव तालुक्यातील दहिगाव गटापासून मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीतच राष्ट्रवादीच्या ढाकणे यांनी तीन हजार 852 मतांची आघाडी घेतली होती. पाचव्या फेरीला ढाकणे यांचे मताधिक्य पाच हजार 205 वर पोहोचले होते. हजारो ढाकणे समर्थक मतमोजणी केंद्राबाहेर जमा होऊन ढाकणे यांचा जयघोष करत होते. पाथर्डीतून ढाकणेंनाच आघाडी राहील, अशी अनेकांचा अंदाज होता. मात्र सर्वांचा अंदाज चुकवत पाथर्डीकरांनी राजळे यांच्या बाजूने कौल दिला. शेवगाव शहरातील मतमोजणीत ढाकणे यांचे माताधिक्य कमी कमी होत गेले. दहाव्या फेरीअखेर ढाकणे यांचे मताधिक्य फक्त 556 राहिले होते.
अकराव्या फेरीला पाथर्डी तालुक्यातून मतमोजणी सुरु झाली व राजळे यांनी तीन हजार 353 मतांची आघाडी घेतली. त्यानंतर प्रत्येक फेरीला कमी-अधिक प्रमाणात आघाडी घेत राजळे यांचे मताधिक्य वाढतच गेले. पाथर्डीतील पूर्व पट्ट्यातून ढाकणे यांना मताधिक्य मिळून राजळे यांचे लिड कमी होईल, असे ढाकणे समर्थकांना वाटत होते. मात्र प्रत्येक फेरीत राजळेंनी आघाडी घेतली. 26 व्या फेरी अखेर राजळे यांचा 14 हजार 294 मतांनी विजयी घोषित करण्यात आले. पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर व भालगाव जिल्हा परिषद गटांतून ऍड. ढाकणे यांना मोठे मताधिक्य मिळण्याची अपेक्षा होती. मात्र तेथेही राजळेंना आघाडी मिळाल्याने ढाकणेंना पराभवाचा सामना करावा लागला.
पाथर्डी तालुक्यातून ढाकणे यांना आघाडी मिळेल, या अपेक्षेने सर्वच कार्यकर्ते आशावादी होते. अत्यंत चुरशीच्या लढतीत शेवटच्या क्षणापर्यंत निकाल काय लागेल, याची शाश्वती नसल्याने दोन्हीही उमेदवारांचे समर्थक मतमोजणी केंद्रात थांबून होते. निकाल कुठल्याही क्षणी फिरू शकतो, हा अंदाज दोन्ही उमेदवारांना आल्याने मतमोजणी संपेपर्यंत दोन्हीही उमेदवार मतमोजणी केंद्राकडे आले नाही. विसाव्या फेरीनंतर राजळे समर्थकांनी गुलाल घेऊन फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. परळी मतदारसंघातून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याने आपण जल्लोष साजरा करणार नाहीत. त्यामुळे फटाके फोडू नका, गुलाल उधळू नका, असे आवाहन राजळे यांनी कार्यकर्त्यांना केल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.
विजय घोषित झाल्यानंतर सुमारे एक तासाने राजळे मतमोजणी केंद्रात आल्या. निवडणूक निर्णय अधिकारी देवदत्त केकण यांच्या हस्ते राजळेंना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, मुलगा कृष्णा राजीव राजळे उपस्थित होते. विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी स्वर्गीय राजीव राजळे व मोनिका राजळे यांचा जयघोष केला.निवडणूक निर्णय अधिकारी देवदत्त केकाण यांना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नामदेव पाटील व विनोद भामरे यांनी सहकार्य केले.
शेवगाव विधानसभा मतदारसंघात उमेदवारनिहाय मिळालेली माहिती खालील प्रमाणे ऍड. प्रताप ढाकणे (राष्ट्रवादी) 98 हजार 215, मोनिका राजळे (भाजप) एक लाख बारा हजार 509 (विजयी), सुभाष साबळे (बसपा) 1124, किसन चव्हाण (बहुजन वंचित आघाडी) 9599, मोतीलाल बताडे 364, करीमउद्दीन शेख 312, विठ्ठल वाघ 489, सदाशिव शिंदे 347.
यावेळी आ. राजळे म्हणाल्या, गेल्या पाच वर्षांत पालकमंत्री राम शिंदे, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सहकार्यामुळे मतदारसंघात मोठ्या स्वरूपाची विकासकामे करता आली.
मतदारसंघात काम करताना शेवगाव-पाथर्डी असा तसेच गटातटाचा, जातीपातीचा असा कोणताही भेदाभेद केला नाही. सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी झाले. त्यामुळे मतदारांनी पुन्हा संधी दिली याबद्दल सर्व मतदाराचे मनापासून आभार व्यक्त करते. आगामी काळात या भागात मिनी एमआयडीसी, छोटे-मोठे उद्योगधंदे उभारून रोजगारनिर्मितीवर भर दिला जाईल. जेणेकरून तरुणांच्या हाताला काम उपलब्ध होईल. तसेच कृषीसाठी शाश्वत सिंचन व्यवस्था करण्यावरही भर राहिल. ही कामे करताना सर्वांना बरोबर घेतले जाईल.