पुणे (प्रतिनिधी) – पुणे शहरात पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेने संयुक्त कोम्बिंग ऑपरेशन राबवत सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या.
या झाडाझडतीत आर्म ऍक्टखाली तब्बल 55 गुन्हेगारांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन गावडी कट्टे, देशी बनावटीची तीन पिस्तूल, नऊ काडतूसे, 40 कोयते, पाच तलवारी, 1 कुकरी, दोन पालघन व एक सुरा जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोरावळे, पोलीस उपायुक्त(गुन्हे) बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
मंगळवारी रात्री 9 ते 1 दरम्यान करण्यात आली. यामुळे गुन्हेगारांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. या पुढेही अचानक कोम्बिंग ऑपरेशन करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.