पुणे – राज्यातील विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग 1 फेब्रुवारी 2022 पासून प्रत्यक्षरीत्या ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. करोनाची स्थानिक परिस्थिती विचारात घेता संबंधित प्राधिकरणाशी चर्चा करून विद्यापीठाने महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, असेही राज्य शासनाने सूचित केले आहे.
करोना व ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या पाहता समूह संसर्गाचा धोका टाळण्यासाठी विद्यापीठे व महाविद्यालयातील नियमित वर्ग 7 जानेवारीपासून ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र करोनाचा प्रादुर्भाव सर्वच भागात सारख्या प्रमाणात नसल्याने व ज्या ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, अशा भागातील विद्यापीठे व महाविद्यालये सुरू करण्याची मागणी होत होती.
त्यानंतर करोना प्रतिबंधात्मक सर्वसाधारण उपाययोजना करून विद्यार्थ्यांसाठी नियमित वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतचे शासन निर्णय मंगळवारी प्रसिद्ध झाला.
करोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, त्याच विद्यार्थ्यांना विद्यापीठ तथा महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची परवानगी राहील. दोन्ही डोस न झालेल्यांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत विद्यापीठाने त्यांच्यास्तरावर निर्णय घ्यावा. त्याचप्रमाणे वसतिगृह टप्प्याटप्प्याने सुरू करण्यासंदर्भात स्थानिक प्राधिकरणाशी चर्चा करून त्यांच्या निर्णय घेणे आवश्यक आहे, असेही शासन निर्णयात नमूद केले आहे.