लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल करण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा नकार

खा. उदयनराजेंच्या उपस्थितीत व्यापारी संघटनांची बैठक निष्फळ

सातारा, दि 8 ( प्रतिनिधी ) – लग्नसराई आणि गुढीपाढवा तोंडावर असताना सातारा शहरात करोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल करण्यास जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गुरुवारी स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यामुळे खा. उदयनराजे व साताऱ्यातील व्यापारी संघटनांसोबत झालेली बैठक निष्फळ ठरली. लॉकडाऊन उठविण्याच्या मागणीसाठी आक्रमक झालेले व्यापारी हात हालवत परत आले.

शेखर सिंह व शहरातील व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची खा. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात दुपारी बैठक झाली. व्यापाऱ्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी करोनाच्या वाढत्या संकटाचा धोका स्पष्ट केला. लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल करण्यास सिंह यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. चंद्रशेखर घोडके, सुदीप भट्टड, रमण भट्टड, प्रवीण राठी, दीपक नावंधर, मोहित कटारिया, भरत वैष्णव आदी पदाधिकारी उपस्थित होते. करोनाचा वाढता प्रभाव, लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेले व्यवसाय या मुद्द्यांवर खा. उदयनराजेंनी सिंह यांच्यासमोर व्यापाऱ्यांची बाजू मांडली.

लग्नसराई व गुढीपाडव्याची तयारी व्यापाऱ्यांनी केली आहे. कर्ज काढून त्यांनी माल भरला आहे. मागच्या वर्षीचा आणि यंदाचाही पाडवा लॉकडाऊनमध्ये गेल्यास व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. बॅंकांची कर्जे, कामगारांचे पगार, दुकान भाडे, वीज बिले, माल खरेदी यात व्यापाऱ्यांची अडचण होत आहे. या बाबी लक्षात घेऊन आठवड्यात किमान पाच दिवस मर्यादित वेळेत व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी चंद्रशेखर घोडके यांनी केली.

उदयनराजेंनीही या मागणीचे समर्थन केले; परंतु सिंह यांनी त्यास नकार दिला. जिल्ह्यात करोनाबाधितांचा आकडा हजाराच्या आसपास आला आहे. आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवल्यास त्यावर नियंत्रण मिळणे कठीण होईल. त्यामुळे शासनाने लागू केलेले निर्बंध शिथिल करता येणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी ठणकावले. तासभर चर्चा होऊनही कोणताही मार्ग निघाला नाही. त्यामुळे व्यापारी संघटनांनी माघार घेतली.

शनिवार, रविवार करोना नसतो का?
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना उदयनराजेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. करोना नियंत्रण व उपाययोजनांसाठी राज्य शासनाकडे तज्ञ समिती व आरोग्य यंत्रणा आहे. सर्व गोष्टींवर लॉकडाऊन हाच पर्याय आहे का? सामान्य माणूस आर्थिक चणचणीने पिचला आहे. शासनाने व्यापाऱ्यांना अनुदान द्यावे. दोन दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन जाहीर केला आहे. शनिवारी व रविवारी करोनाचा विषाणू नसतो का, असा सवाल त्यांनी केला. लस पुरवठ्यात केंद्र सरकार दुजाभाव करत असल्याच्या आरोपाचेही त्यांनी खंडन केले.

गुढीपाडव्याच्या आधी दुकाने उघडायची परवानगी शासनाने दिली, तरच दुकाने उघडली जातील. शासनाने घेतलेला लॉकडाऊनचा निर्णय जनतेच्या हिताचा आहे; पण त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. व्यापाऱ्यांना वीज बिले, पालिका कर, प्राप्तिकर, जीएसटी, व्यवसाय कर, बॅंकेच्या कर्जांचे हप्ते, कामगारांचे पगार, जागा भाडे भरावेच लागते. त्यामुळे व्यापारी नाराज आहेत. सणासुदी व लग्नसराईत व्यापाऱ्यांचे होणारे नुकसान थांबवण्याबाबत शासनाने विचार करावा.

– चंद्रशेखर घोडके,
उपाध्यक्ष, सातारा सराफ व सुवर्णकार असोसिएशन

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.