नेवासा दि.१० (प्रतिनिधी) – नेवासा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे पती व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून पाच सदस्यांनी सदस्य पदाचे सामूहिक राजीनामे दिले आहेत.
नेवासा बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांना सादर केलेल्या राजीनामा पत्रात सुधाकर मोहन कोकणे, नीता नवनाथ मारकळी,अनिता अर्जुन जाधव,प्रतिमा अंकुश बंदिवान,मनीषा आबासाहेब डौले या पाच सदस्यांनी म्हटले आहे की,मागील वर्षापासून नेवासा बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये सरपंच व ग्रामसेवक यांच्या जाचास व मनमानी कारभारामुळे तसेच महिला सदस्यांनी मिटींगमध्ये केलेले ठराव सरपंच पती व ग्रामसेवक प्रोसिडिंगला वेगळेच ठराव करून महिला सदस्यांनी सुचविलेले कामे रद्द करून स्वतःच नवीन कामे स्वतःच करतात.याचा जाब विचारला असता महिला सदस्यांना उडवाउडवीची उत्तरे व अपमानास्पद वागणूक देतात.त्यामुळे सरपंच व ग्रामसेवक यांना कंटाळून सामूहिक राजीनामे देत असल्याचे म्हटले आहे.