स्वच्छ सुंदर शहरासाठी 100 टक्के कचर्‍याचे संकलन करा

घनकचरा विभागाच्या बैठकीत उपायुक्त यशवंत डांगे यांचे आदेश

नगर (प्रतिनिधी) – एक लाख वीस हजार घरापर्यंत घंटागाडी जावून 100 टक्के कचर्‍याचे संकलन होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सुका व ओला कचरा विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया झाली पाहिजे. तेव्हाच  खर्‍या अर्थाने आपले शहर स्वच्छ व सुंदर राहिल. यासाठी सर्व घनकचरा व आरोग्य विभागाने कामाचे नियोजन करावे, असे उपायुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.

महानगरपालिकेत स्वच्छ सुंदर शहरासाठी घनकचरा विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. यावेळी स्वच्छता निरीक्षक, केअरटेकर, मुकादम व कचरा संकलन एजन्सीचे कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी डांगे म्हणाले, शहरातील 3 रॅम्प वरून घंटागाडीतील कचरा कॉम्पॅक्टरद्वारे कचरा डेपोवर वेळेचे नियोजन करून पाठविण्यात यावे. आपण ठेकेदारामार्फत उचलल्या जाणार्‍या कचर्‍यासाठी कोट्यावधी रूपये देतो, त्याच्याकडून काम करून घेणे गरजेचे आहे. यासाठी नियोजन करा. आपण भारत स्वच्छ अभियानाकरिता काम न करता वर्षभर काम करावे, अशी माहिती त्यांनी दिली.

कुठेही रस्त्यावर कचर्‍याचे ढिग दिसणार नाही, याची काळजी घ्या. मी सकाळी 7 वाजल्यापासून शहरात फिरत असतो. मला सर्व माहिती झाली आहे. गाड्यांना जीपीएस बसविले आहेत का याची माहिती घ्या. त्याचबरोबर घंटागाडीवरील गाणे चालू ठेवा. नागरिकांसाठी हेल्पलाइन उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तीच गाडी, ड्रायव्हर, हेल्पर त्याच प्रभागामध्ये दररोज गेली पाहिजे.

वाहनाबरोबर मनपाचे कर्मचारी पाठविण्याची व्यवस्था करावी. ओला व सुका कचरा वेगळा करणे गरजेचे आहे. यासाठी ठेकेदार यांनी घंडागाडीला दोन कप्पे करण्यात यावे व नागरिकांना याची माहिती दयावी. नागरिकांमध्ये मनपा बद्दलची भावना सकारात्मक होईल यादृष्टिने काम करा. आपण शहरामध्ये काम करतो असे दिसले पाहिजे. त्यानंतरच नागरिक यामध्ये सहभागी होतात.

स्वच्छता अ‍ॅपवर तक्रार आल्यानंतर ताबडतोब ती सोडविण्यासाठी कर्मचारी यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष जावून तक्रारीचे निराकरण करावे. शहरातील 17 प्रभागामधील एक रस्ता निवडा व त्याचे सुशोभिकरण करावे. 60 घंटागाड्या, 15 ट्रॅक्टर व 3 कॅम्पॅक्टरद्वारे पूर्ण क्षमतेने कचरा उचलला गेला पाहिजे. दर सोमवारी दुपारी 4 वाजता बैठक घेतली जाईल. त्यामध्ये शहरातील कचर्‍यासंदर्भात आढावा घेवून नियोजन करण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त यशवंत डांगे यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.