चक्रीवादळामुळे साताऱ्यात थंडावा

पारा 36 अंश सेल्सिअसवर स्थिरावला चक्रीवादळामुळे साताऱ्यात थंडावा

अरबी समुद्रात वादळाची शक्‍यता नाही फॅनीचा प्रभाव अरबी समुद्रात हस्तांतरित होणार अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र हवामान विभागाच्या सूत्रांनी या गोष्टीचा इन्कार केला आहे. एप्रिल आणि मे या दोन मान्सूनपूर्व महिन्यात बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे तयार होऊन वादळं येण्याची शक्‍यता असते. पूर्व किनाऱ्यावर अशा वादळांची शक्‍यता अधिक असते. मात्र सध्या अरबी समुद्रात अशा वादळाची शक्‍यता नसल्याचे हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

सातारा – भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकलेल्या “फनी’ चक्रीवादळाचा प्रभाव साताऱ्यात जाणवला आहे. पारा चक्क 36 अंश सेल्सिअसवर स्थिरावल्याने पहाटेच्या सुखद गारव्याची अनुभुती होऊ लागली आहे. उन्हाचा तडाखा सुसहय होत असून साताऱ्यात थंडावा निर्माण झाला आहे. अचानक हवामानातील बदलाने नागरिकांच्या पुन्हा तब्येतीच्या तक्रारी वाढल्या आहेत.फनीचा तडाखा ओसरल्यावर महाराष्ट्रातील तापमान पुन्हा वाढण्याची शक्‍यता असल्याचे हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

फॅनी चक्रीवादळामुळे तयार झालेल्या ढगांच्या पसाऱ्यामुळे (क्‍लाऊड बॅण्ड) वायव्येकडून येणाऱ्या उष्ण लहरींना अटकाव झाला आहे. परिणामी, महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमानात एक ते दोन अंशाने घट नोंदविण्यात आली आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणदेखील आहे. सध्या फॅनी चक्रीवादळ नैर्ऋत्येकडे सरकले असून त्याची तीव्रता कमी होत आहे. फॅनी चक्रीवादळ पूर्णपणे क्षीण होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील तापमानातील बदल तसाच राहील, असे हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर पुढील दोन दिवसांत पुन्हा तापमानात वाढ होऊ शकते. सातारा शहरासह जिल्ह्यात विशेषतः पश्‍चिम भागात सकाळचा गारवा वाढला असून गरमाईचे गरगरणारे सिलिंग फॅन बंद करून चक्क चादर ताणून झोपण्याची वेळ आली आहे . सायंकाळी चार नंतरही सूर्यास्तानंतरच्या संधीकालात गार वाऱ्यासह गारठा वाढत असून नागरिकांना साताऱ्यातच हिलस्टेशनचा फील येऊ लागला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.