येत्या काही दिवसांमध्ये उत्तर भारतात पसरणार थंडीची लाट ?

पंजाबमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता

नवी दिल्ली : उत्तर भारतात पंजाबसह अन्य राज्यात सलग दुसऱ्या आठवड्यात थंडीची लाट पसरली आहे. या शीत लहरीस ध्रुवीय भोवरा (पोलार व्हर्टेक्‍स) कारणीभूत असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे. पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशात उंचावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यावर ध्रुवीय भोवऱ्याची स्थिती निर्माण होते. येत्या काही दिवसांत तरी ही स्थिती कायम राहण्याची शक्‍यता असून नव्या वर्षांच्या आरंभकाळात पंजाबमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्‍यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे थंडीमुळे होणाऱ्या त्रासामध्ये आणखी भर पडण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

भारतीय हवामान खात्याच्या चंडीगढ कार्यालयाचे संचालक सुरिंदर पॉल यांनी याविषयी माहिती दिली. पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांभोवती ध्रुवीय भोवऱ्याचे मोठे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र कमी दाबाचे आणि थंड हवेचे आहे. आर्टिक प्रदेशातून येणारे वारे आणि पश्‍चिमेकडील वातावरणीय घटक या ध्वुवीय भोवऱ्यामुळे दक्षिणेकडे ढकलेले जात आहेत. त्यामुळे विशेषत: हिवाळ्यात ध्रुवीय भोवऱ्यातून थंडीची लाट निर्माण होते. यापूर्वी 2014 मध्ये याचप्रकारे अनेक दिवस देशात थंडीची लाट पसरली होती. गुरुवारी चंडीगडमध्ये दिवसाचे कमाल तापमान 9 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.

येत्या काही दिवसांत दिवसाचे कमाल तापमान 8 अंश सेल्सिअसपर्यंत घसरू शकते, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. दरम्यान, हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, थंडीची लाट नाहिशी करण्यासाठी संबंधित प्रदेशात प्रतितास 10 ते 15 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची गरज असते. सध्या त्यापेक्षा मंद गतीने वारे वाहत असल्याने थंडीचा कडाका होण्याची शक्‍यता सध्या तरी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.