मुंबई : काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागराला फेंगल चक्रीवादळ धडकल्यामुळे राज्याला चांगलाच फटका बसला होता. अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे नागरिकांना हिवाळा ऋतूमध्ये पाऊस पडत असल्याचे दिसत होते. मात्र आता नागरिकांचा हा त्रास काहीसा कमी होणार आहे. राज्यभरात थंडीचा जोर पुन्हा वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मागील 3 दिवसांपासून ढगाळ व दमट हवामान होते. थंडी गायब झाली होती. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना दक्षिणेकडून येणाऱ्या दमट वारे थांबवल्याने अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांचा वेग वाढून पावसाला पोषक परिस्थिती निर्माण झाली होती. आता कमी दाबाचा हा पट्टा ओसरला असून कोरडे वारे राज्यभर वाहणार आहेत. ९ डिसेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागांत शुष्क अन् कोरडे वातावरण राहणार आहे. तर आजपासून पुन्हा तापमानात घट होऊन थंडी वाढणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा पुढील 10 दिवस म्हणजे बुधवार दिनांक 18 डिसेंबरपर्यंत थंडी टिकून राहण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र थंडीचा परिणाम दोन दिवस उशिराने म्हणजे मंगळवार 10 डिसेंबरनंतर जाणवण्याची शक्यतेचा अंदाज आहे. विदर्भ वगळता महाराष्ट्रात सध्या तरी पावसाची शक्यता नाही. विदर्भातही तूरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
पुढील 10 दिवसातील पहाटे 5 चे किमान व दुपारी 3 चे कमाल अशी दोन्हीही तापमाने घसरून, सरासरी इतकी म्हणजे, भागपरत्वे किमान 10 ते 12 तर कमाल 28 ते 30 डिग्री से. ग्रेड दरम्यान राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुढील 10 दिवस थंडीचे आहेत. शेतकऱ्यांनी रब्बी पिकांचे सिंचन, तणनियंत्रण व खत नियोजन यांचा मेळ घालून पीक वाढीचा वेग-दर साधावा. कारण डिसेंबरातील थंडीच्या मासिक अंदाजनुसार, शेवटच्या आठवड्यात कमाल व किमान अशी दोन्हीही तापमाने, सरासरीपेक्षा अधिक राहून थंडी सरासरीपेक्षा कमी जाणवण्याची शक्यता आहे.