जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा बर्फवृष्टी
नवी दिल्ली : जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश मध्ये पुन्हा एकदा हिमवृष्टी सुरु झाल्याने संपूर्ण उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. हिमाचल प्रदेश मध्ये डोंगराळ भागात काल पुन्हा एकदा जोरदार हिमवृष्टी झाली. तिथे आजही जोरदार पाऊस पडेल आणि बर्फवृष्टी होईल अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
जम्मू काश्मीर आणि लडाख मध्ये झालेल्या हिमवर्षावामुळे तिथे थंडीचा जोर वाढला आहे. तिथेही येत्या दोन दिवसात मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. श्रीनगरमधे रात्रीचं तापमान उणे तीन पूर्णांक सात दशांश अंश सेल्सियस नोंदवले गेले.
लडाखमधेही पारा शून्य अंशाच्या खाली आहे. हिमाचल प्रदेशात हवामान थंड आणि कोरडे असून, मनाली, सुंदेरनगर, भुंतार, केलॉंग आणि कल्प प्रदेशात गोठवणारी थंडी आहे. दिल्लीतही कडाक्याची थंडी असून सर्वत्र दाट धुकं पसरले आहे. त्यामुळे अनेक रेल्वे गाड्या आणि विमानांची उड्डाण रद्द करण्यात आली आहेत.
धुक्यामुळे काल दिवसभरात 19 विमानांची उड्डाण रद्द केली तर 5 विमानांचा मार्ग बदलल्याचे दिल्ली विमानतळातल्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
राजस्थानात काल सर्वात कमी साडेतीन अंश तापमान सिकार इथे होते. पंजाब आणि हरयाणा राज्यातही तापमानात घट झाली असून, चंदीगढमधे कालचा दिवस हंगामातला सर्वात थंड दिवस ठरला.
दिल्ली आणि उत्तर भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये पोहोचणाऱ्या 100 हुन अधिक रेल्वेगाड्या विलंबाने धावत आहेत. दिल्लीत आज हलक्या पावसाची शक्यता असून त्यामुळे थंडीत वाढ होऊ शकते.