रणधुमाळी थंडावली

विधानसभा निवडणूक  : अखेरच्या दिवशी रिमझिम पावसात प्रचार तापला

जागता पहारा
शनिवारी (दि. 19) सायंकाळी अधिकृत प्रचार समाप्त झाला असला तरी छुप्या पद्धतीने प्रचार सुरू राहणार आहे. मतदारांपर्यत व्होटर स्लिप पोहचल्या आहेत किंवा नाही. मतदानच्या पोलिंग एजंट नेमणे, बूथ उभारणे व याठिकाणी राबणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी चहा-पाण्याची व्यवस्था करणे. फोडाफोडीचे राजकारण, नाराजांचे मन वळविण्याचा प्रयत्न अणि याहून अगोदरच्या रात्री आपली हक्काची मते राखण्यासाठी कार्यकर्त्यांना जागता पहारा सुरु आहे.

पिंपरी  – विधानसभा निवडणुकीसाठी मागील 13 दिवसांपासून रंगलेले प्रचाराचे धुमशान अखेर आज (शनिवारी) थंडावले. रिमझिम पावसात पदयात्रा, मतदारांच्या गाठीभेटी, प्रचार फेऱ्यांनी प्रचाराचा शेवटचा दिवस तापला होता. जाहीर प्रचार संपताच पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे. उमेदवारही एकमेकांच्या छुप्या प्रचारावर लक्ष ठेवून आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी येत्या सोमवारी (दि. 21) मतदान होणार असून प्रचाराची सांगता शनिवारी (दि. 19) झाली. मागील दोन आठवड्यांपासून मेळावे, प्रचारसभा, कोपरासभा, प्रत्यक्ष गाठीभेटी याद्वारे निवडणुकीचे रण तापविणाऱ्या राजकीय पक्षांसाठी प्रचाराची मुदत शनिवारी सायंकाळी 5 वाजता संपली मात्र यानंतर पुढील काही तास डोळ्यात तेल घालून प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या गुप्त हालचाली टिपण्यावर कार्यकर्त्यांचे लक्ष राहणार आहे. तर निवडणूक विभागानेही प्रत्येक उमेदवारांच्या हालचालींवर लक्ष ठेवले आहे.

पिंपरीत 18, चिंचवडमध्ये 11 आणि भोसरीमधून 12 असे शहरातून एकूण 41 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. दि. 7 ऑक्‍टोबरला निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली. यंदाची विधानसभेची निवडणूक पुरस्कृत उमेदवारीमुळे गाजली. भोसरी व चिंचवडमध्ये आपल्या उमेदवारांचे अर्ज बाद करीत पुरस्कृत उमेदवार करण्याचा नवा पॅटर्न समोर आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भोसरीतील रोड शो तसेच चिंचवडमधील सभा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडकर, महिला व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेते देवदत्त नागे यांच्या सभा झाल्या.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मोबाईलवरुन घेतलेली सभा अभिनव प्रयोग ठरला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेची उणीव जाणवली. कॉंग्रेस, मनसेच्या एकाही नेत्याची सभा झाली नाही. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राजकीय नेत्यांसह उमेदवारांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडून वातावरणात खऱ्या अर्थाने रंग भरला. यंदाच्या निवडणुकीमध्ये स्थानिक प्रश्‍नांवर समस्यांवर भर दिल्याचे पहायला मिळाले. अनधिकृत बांधकाम, शास्ती कर, पाणी प्रश्‍न, कचरा समस्येचा ऊहापोह झाला.

विकासाचे मुद्दे, सरकारचे विविध प्रश्‍नांकडे झालेले दुर्लक्ष यावरच चिंचवड विधानसभा मतदार संघात प्रचाराचा भर राहिला. भोसरी विधानसभा मतदार संघात शेवटच्या दोन दिवसात प्रचाराने खालची पातळी गाठल्याचे पहायला मिळाले. पिंपरी विधानसभेत यावेळी रंगतदार प्रचाराचा अभाव जाणवला. स्मरणात राहील, अशी एकही सभा यावेळी झाली नाही. प्रचारासाठी कमी दिवस मिळाल्याने उमेदवारांनी नेत्यांवर अवलंबून न राहता वैयक्‍तिक प्रचारावर भर दिला. हायटेक प्रचारावर यावेळी भर दिसला. सोशल मीडियाचा पुरेपूर वापर झाला.

आज शेवटच्या दिवशी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी उमेदवारांकडून प्रचार फेऱ्या आयोजित केल्या होत्या. सकाळपासून ढगाळ वातावरण, थंडगार वारे आणि रिमझिम पावसाचा मारा होता. मात्र, प्रचारासाठी अखेरचा दिवस असल्याने शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून केला जात होता. प्रचार फेऱ्या, पदयात्रा, वैयक्तिक गाठीभेटी, प्रचाराची गाणी लावून फिरणाऱ्या वाहनांनी वातावरण तापविले होते. मतदानाच्या दिवशी अधिकाधिक मतदारांना बाहेर काढण्यासाठी उमेदवारांकडून व्यूहरचना आखली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.