पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांची कृषी आयुक्त म्हणून बदली झाली. यानंतर त्यांच्याकडील सर्व विभागांचे पदभार कोणाकडे ठेवायचे? याबाबत महापालिका आयुक्तांनी निर्णय घेणे अपेक्षित होते. पण, शासनाने स्वतंत्र आदेश काढत हे सर्व पदभार अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांच्याकडे दिले.
त्यामुळे शासनाने थेट महापालिका आयुक्तांच्या अधिकारवरच गदा आणल्याची चर्चा होती. त्यानंतर महिनाभराने आयुक्तांनी वचपा काढत अतिरिक्त आयुक्तांकडील काही खात्यांचा पदभार काढून घेत स्वत:कडे घेतला आहे.
त्यात बांधकाम, निवडणूक आणि इतर काही खात्यांचा समावेश आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्येच अधिकार वादावरून शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा आहे.
महापालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त राजेंद्र भोसले यांची नियुक्ती आहे. तर, अतिरिक्त आयुक्तांची तीन पदे आहेत.
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर दोन अतिरिक्त आयुक्तांची बदली झाल्यानंतर बिनवडे हे एकमेव अतिरिक्त आयुक्त होते. डाॅ. कुणाल खेमनार यांच्या जागी शासनाने पृथ्वीराज बी.पी. यांची नियुक्ती केली.
तर, विकास ढाकणे यांची जागा रिक्तच होती. त्यामुळे आयुक्तांनी खेमनार यांच्याकडील सर्व खात्यांचे कामकाज पृथ्वीराज यांच्याकडे दिले.
तर, ढाकणे यांच्याकडे असलेले सर्व विभागाचे कामकाज स्वत:कडे ठेवले. त्यानंतर बिनवडे यांची बदली झाल्याने त्यांच्याकडील खात्याचे कामकाज कोणाला द्यायचे, याचा निर्णय आयुक्तांनी घेणे अपेक्षित होते. पण, नगरविकास विभागाने थेट हस्तक्षेप करत बिनवडे यांचा पदभार पृथ्वीराज यांना दिला होता. त्यानंतरच या वादाला सुरूवात झाल्याची चर्चा आहे.
प्रशासकीय कामासाठी निर्णय : आयुक्त
अतिरिक्त आयुक्तांची खाती कमी करण्याबाबत महापालिका आयुक्तांनी खुलासा केला आहे. प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी हे बदल केल्याचे ते म्हणाले.
महापालिकेत दोन अतिरिक्त आयुक्तांची पदे रिक्त असून त्या जागी शासनाने कोणाची नियुक्त केल्यास अडचण असू नये, असे राजेंद्र भोसले यांनी म्हटले आहे.
मात्र, प्रत्यक्षात ज्या बांधकाम आणि निवडणूक विभाग, तसेच वाॅर्ड रचना विभागाच्या कामकाजांवरून हा प्रकार सुरू आहे. ते विभाग आयुक्तांकडे घेण्यात आले आहे. हे दोन्ही विभाग धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी असल्याने हा बदल केल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे.