पुणे – शहरातील तापमानात सातत्याने चढ-उतार सुरू असतानाच बुधवारी (दि.3) किमान तापमानात चांगलीच घसरण झाली. परिणामी, हवेत गारठा वाढला असून, पुणेकरांना सकाळपासूनच थंडीचे पुनरागमन झाल्याचे अनुभवायला मिळाले.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून मध्य महाराष्ट्रावर अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्राचा प्रभाव होता. यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेच्या प्रवाहासाठी अडथळा निर्माण झल्याने वातावरणात सातत्याने बदल होत होते.
किमान तापमानात सातत्याने चढ-उतार पहायला मिळत होते. मात्र, आता हा पट्टा काहीसा पुढे सरकून अरबी समुद्रात उत्तर केरळ ते दक्षिण गुजरातदरम्यान सक्रिय झाला आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांसमोरील अडथळा कमी झाल्याने या वाऱ्यांचा प्रभाव वाढला आहे. दरम्यान, आगामी काही दिवस वातावरण कोरडे राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
बुधवारचे शहरातील तापमान
किमान – 10.7
कमाल – 29.7
(अंश सेल्सिअसमध्ये)