“स्वाइन फ्लू’ आजारही नियंत्रणात
पिंपरी – शहरातील महापालिका रूग्णालये व दवाखान्यांमध्ये बाह्यरूग्ण विभागात तपासणीसाठी येणाऱ्या रूग्णांचे प्रमाण जास्त असले तरी तुलनेत सर्दी, ताप, खोकल्याच्या रूग्णांचे प्रमाण मात्र घटले आहे. गेल्या पाच दिवसांत हे चित्र पाहण्यास मिळत आहे. स्वाइन फ्लू आजाराची गेल्या तीन महिन्यांत फक्त दोघांनाच लागण झाली आहे. हा आजारही सध्या नियंत्रणात असल्याचे वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले.
देशभरात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणजे रस्त्यांवर तुरळक वाहने पाहण्यास मिळत आहे. नागरिकांनी घरातच बसण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका कमी झाला आहे. त्याशिवाय, लॉकडाऊन लागू होण्यापूर्वीच करोना विषाणूचा संसर्ग होण्याच्या धास्तीने बऱ्याच नागरिकांनी “गड्या आपला गाव बरा’ असे म्हणत गाव गाठले आहे.
पर्यायाने, सर्दी, ताप, खोकला आदींचे रूग्णही घटले आहेत. 22 तारखेला 91 जणांनी रूग्णालयांतील बाह्यरूग्ण विभागात तपासणी केली. त्यातील 11 रूग्ण हे सर्दी, ताप, खोकल्याचे होते. 23 आणि 24 तारखेला मात्र या रूग्णांचे प्रमाण वाढले. 23 तारखेला बाह्य रूग्ण विभागात तपासणी झालेल्या 4 हजार 951 जणांपैकी 1 हजार 142 रूग्ण हे सर्दी, ताप, खोकल्याचे होते. तर, 24 तारखेला तपासणी केलेल्या 5 हजार 14 रूग्णांपैकी 1 हजार 314 रूग्णांना सर्दी, ताप, खोकला झाला होता. बुधवारी (दि. 25) फक्त 9 रूग्ण होते. तर, गुरूवारी (दि. 26) एकूण तपासणी केलेल्या 3 हजार 592 रूग्णांपैकी 745 जणांना सर्दी, ताप, खोकला असल्याचे आढळले.
“स्वाइन फ्लू’ आटोक्यात
स्वाइन फ्लू आजाराची शहरात गेल्या तीन महिन्यात फक्त दोघांनाच लागण झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात स्वाइन फ्लूची एकाला लागण झाल्याचे आढळले होते. तर, मार्च महिन्याच्या सुरवातीला आणखी एकाला लागण झाली. सध्या मात्र नव्याने स्वाइन फ्लूची कोणालाच लागण झालेली नाही. महापालिका रूग्णालये व दवाखान्यांमध्ये 1 जानेवारीपासून आत्तापर्यंत 3 लाख 23 हजार 597 रूग्णांनी बाह्यरूग्ण विभागात तपासणी करून घेतली. त्यामध्ये 69 हजार 665 रूग्णांना सर्दी, खोकला, ताप हे आजार झाल्याचे आढळले. त्यातील 1 हजार 871 जणांना टॅमिफ्ल्यू गोळ्या देण्यात आल्या. तर, 32 जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. 2 रूग्णांना स्वाइन फ्लूची लागण झालेली आहे.