सखोल चौकशी करण्याची मागणी; प्रशासन म्हणते, “प्रक्रिया नियमानुसार’
पुणे – जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीतून महापालिकेने 31 शीतशवपेटी खरेदी केल्या असून, त्या महापालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मात्र, या शीत शवपेट्यांच्या खरेदीच्या निविदांची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
एखाद्याचे निधन झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक अंत्यविधीसाठी येण्यास वेळ लागतो. यामुळे पार्थिव सुरक्षित आणि सुस्थितीत ठेवण्यासाठी शवागारात ठेवले जाते. परंतु, अनेकवेळा शासकीय रुग्णालयातील शवागारात जागा नसते. तसेच खासगी रुग्णालयातील शवागारातील शुल्क परवडत नाही. यातून नागरिकांना सेवा देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने महापालिकेला सुमारे 19 लाख 50 हजार रुपये निधी दिला आहे. त्यानुसार विद्युत विभागाने या शीतशवपेटी खरेदी करण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. प्रती नग 61 हजार 863 रुपयांप्रमाणे या 31 शीतशवपेटी खरेदी केल्या आहेत.
निविदा प्रक्रियेची चौकशी करावी
या निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र धावडे यांनी केली. ही निविदा घेणाऱ्या कंपनीने सुरवातील 113 टक्के वाढीव दराने भरली होती. परंतु हीच निविदा त्याने पाच टक्के वाढीव दराने मंजूर केली. या निविदा प्रक्रियेत रिंग झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे, असा आरोपही धावडे यांनी केला आहे.
या शीतशवपेट्या महापालिकेच्या विविध रुग्णालयांत ठेवल्या जाणार आहे. उपनगरांतील रुग्णालयांत जागा उपलब्धततेनुसार शीतशवपेटींची संख्या ठरवली जाणार आहे. याचा वापर करण्यासाठी शुल्कही घेतले जाणार आहे. याची खरेदी निविदा प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवली गेली आहे. संबंधित निविदा मिळालेल्या कंपनीने शीतशवपेटीच्या कॉम्प्रेसरची दोन वर्षांची वॉरंटी दिली आहे. त्याचप्रमाणे त्याची देखभाल-दुरुस्ती पुढील पाच वर्षासाठी कंपनीच करणार आहे. यासंदर्भातील मेल कंपनीने पाठवला आहे.
– श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग