कोयना 80 टीएमसी

पाटण  – कोयना पाणलोट क्षेत्रासह तालुक्‍यात गुरूवारी सकाळपासून पावसाने झोडपून काढले आहे. एकसारख्या पडणाऱ्या पावसामुळे ओढे-नाले-नद्या तुडूंब भरून वाहत आहे. कोयना पाणलोट क्षेत्रातही आज जोरदार अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे धरणात प्रतिसेकंद 40 हजार क्‍युसेक्‍स पाण्याची आवक होत आहे.

धरणात पाणीसाठा 79.56 टीएमसी झाला आहे. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने पायथा वीजगृहातून सकाळी 9 वाजता 1050 क्‍युसेक्‍स पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
आज सकाळपासून कोयना पाणलोट क्षेत्रासह तालुक्‍यात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे कोयना नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे.

पाटणच्या दक्षिणेकडील गावांना जोडणारा मूळगाव पुलाला पाणी लागल्याने कोणत्याही क्षणी पुलावरून पाणी जाण्याची भिती निर्माण झाली आहे. मुळगाव पुलावरून पाणी गेल्यास दक्षिणेकडील गावांचा जवळचा संपर्काचा मार्ग बंद होणार आहे.पाटण पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मूळगाव पुलावरील वाहतूक तात्पुरती बंद ठेवली आहे. तर याठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. पाणीपातळी 2140.08 फूट झाली असून उंची 652.475 मिलीमीटर झाली आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात कोयना 175(3397) मिलीमिटर, नवजा 179(3938) मिलीमिटर, महाबळेश्‍वर 253(3406) मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.

तर वक्र दरवाजातून पाणी सोडले जाणार

कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढत आहे. मात्र यानंतरही पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास व धरणातील 83 टीएमसी पाणीसाठा झाल्यानंतर धरणातील पाण्याची आवक पाहून धरणाच्या सहा वक्र दरवाजातून समुारे दहा हजार क्‍युसेक्‍स पाणी सोडावे लागणार आहे. मात्र हवामान खात्याने दोन दिवस मुसळधार पाऊस आसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर पावसाचे प्रमाण वाढल्यास कोयना धरणाच्या सहा वक्र दरवाजातून पाणी सोडावे लागणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.