संजीवनीच्या विद्यार्थ्यांची कॉग्निझंटमध्ये निवड

कोल्हे : एकापाठोपाठ नामांकित कंपन्यांमध्ये धडाकेबाज प्लेसमेंट

कोपरगाव – संगणकीय आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कॉग्निझंट सोल्युशन्स्‌ या अमेरिकन बहुराष्ट्रीय आघाडीच्या कंपनीने संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील आठ विद्यार्थ्यांची आकर्षक पगारावर नोकऱ्यांसाठी निवड केली असून, हे सर्व विद्यार्थी त्यांच्या अंतिम निकालानंतर लागलीच सेवेत रूजू होणार आहेत.

एका पाठोपाठ एक कंपन्या संजीवनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना आकर्षक पगाराच्या नोकऱ्या देत आहेत, ही बाब संजीवनीच्यादृष्टीने अत्यंत महत्वाची असून ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी स्वावलंबी होत असल्याचे आनंददायी चित्र निर्माण झाले आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस्‌चे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

विद्यार्थ्यांच्या या निवडीबाबत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस्‌चे संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितिन कोल्हे व आमदार स्नेहलता कोल्हे यांनी समाधान व्यक्त केले. सर्वांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनीही निवड झालेल्या स्नेहल राजेंद्र जांभुळकर, प्रगती अरूण वाघमारे, प्रिया देवराम चोखंडे, हर्षदा बाळासाहेब खालकर, वृषाली राजेंद्र वाखारे, अर्जन प्रशांत मुटेकर, गौरव विश्‍वनाथ चौधरी व शुभम बाबासाहेब आहेर यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला.

कोल्हे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की, नवोदीत अभियंत्यांना उद्योगांची पसंती कमी आहे, त्यामुळे महाराष्ट्रात अभियांत्रिकीच्या अनेक जागा रिक्त राहतात. हे वास्तव आहे, कारण फार थोड्या संस्था व उद्योग यांच्यातील परस्परातील समन्वय ठेऊन आहेत. परंतु संजीवनीच्या व्यवस्थापनाने ही बाब मागील अनेक वर्षांपासून जाणली. वेगवेगळ्या कंपन्यांशी सामंजस्य करार, परदेशी विद्यापीठाशी करार, उद्योगाला नेमके कसे मनुष्यबळ पाहिजे या सर्व बाबींवर लक्ष केंदीत केले, त्या पध्दतीने नियमित अभ्यासक्रमाबरोबरच अधिकचा अभ्यासक्रम शिकवून विद्यार्थ्यांना मुलाखतींसाठी सक्षम केले.

याचबरोबर वेगवेगळ्या कंपन्यांच्या मानव व संसाधन विभागाशी कायम चर्चा करून कंपनी व अभियांत्रिकी शाखानिहाय विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतली जाते. याचा परीपाक म्हणून संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय ग्रामीण भागात असूनही आज विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत नोकऱ्या मिळवून देण्यासाठी आघाडीवर असल्याचे चित्र पुरव्यानिशी निर्माण झाले आहे. त्यातून जास्तीत जास्त विध्यार्थ्यांना नोकऱ्या देण्याचे कार्य जोमाने सुरू असल्याचे कोल्हे यांनी शेवटी म्हटले आहे. अमित कोल्हे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा छोटेखानी सत्कार केला, त्यावेळी प्राचार्य डॉ. डी. एन. क्‍यातनवार, प्रा. डॉ. अभिषेक भागवत, प्रॉ. डॉ. बी. एस. आगरकर व प्रा. डॉ. ए.बी. पवार आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.