राजगुरूनगर : राजगुरुनगर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नाग आणि मांजराचा संघर्ष पाहायला मिळाला. मांजराने नागाला अडवून ठेवल्याने दुर्घटना टळली आहे.
याबाबतची माहिती अशी की, राजगुरूनगर येथील वृंदावन सोसायटी जवळील मोकळ्या जागेत शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास 5 ते सहा फूट लांब विषारी नाग निघाला होता.
या ठिकाणी तीनही बाजूकडून सोसायट्या आणि घरे आहेत. नाग निघाल्याची चाहूल मांजराला लागल्याने मांजराने त्यास रोखून धरले. यावेळी नाग आणि मांजर यांच्यात संघर्ष झाला .
मांजर नागाला इकडेतिकडे जाऊ देत नव्हते, तर नाग तेथून जाण्याचा प्रयत्न करीत होता. मांजराच्या आवाजाने नागरिकांनी तेथे गर्दी केली.
नागरिकांनी तात्काळ याची माहिती सर्प मैत्रिणीला दिली. नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे मांजर तेथून निघून गेल्यानंतर नागही एका बिळात लपून बसला.
सर्प मैत्रिण प्रिया थोरात यांनी बिळात पाणी सोडल्यानंतर नाग बाहेर आला. त्यानंतर प्रिया थोरात यांनी नागाला पकडून जंगलात सोडून दिले.