नवी दिल्ली – भारतात दोन करोना व्हायरसविरोधी लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजूरी देण्यात आली आहे. येत्या 16 जानेवारीपासून देशात प्रत्यक्ष लसीकरणाला सुरूवात होणार असल्याची माहिती केंद्र सरकरतर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे करोना लस घेण्यासाठी काय प्रक्रिया आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
एका सामान्य नागरिकाला करोना लस घेण्यासाठी कोणती प्रक्रिया पार पाडावी लागेल हे सरकारने स्पष्ट सांगितले आहे. खालील आठ स्टेप फाॅलो करून तुम्ही करोना लस घेऊ शकता…
1) करोना लसीसाठी तुम्हाला सर्वात पहिले फोटो आयडीनुसार Co-Win सिस्टमवर रजिस्ट्रेशन करावे लागेल. तुमच्या मोबाईलवर Co-Win अॅप डाउनलोड करावे लागेल आणि तेथेच तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशनसाठी फोटो आयडीची आवश्यकता आहे.
2) लाभार्थ्यांना SMS वरून मिळेल माहिती –
रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर मेसेज येईल. पहिल्यांदा SMS वरून रजिस्ट्रेशनची पुष्टी केली जाईल. दुसऱ्या मेसेजवरून तुम्हाला लसीची तारीख, वेळ आणि ठिकाण सांगितले जाईल. तिसरा मेसेज लसीच्या पहिल्या डोसनंतर येईल, ज्यानुसार तुम्हाला लसीच्या पुढील डोसविषयी माहिती देण्यात येईल. दुसऱ्या डोसनंतर एका लिंकसोबत मेसेज येईल, जामध्ये लसीकरणाचे डिजिटल प्रमाणपत्र असेल.
3) लसीकरण साईटवर होईल तपासणी
लसीकरण साईटच्या एन्ट्री पाॅइंटवर ऑफिसर – 1 चा सामना होईल, जो रजिस्ट्रेशन आणि फोटो आयडी तपासेल. हा ऑफिसर लाइन आणि गर्दीचे व्यवस्थापनही करेल.
4) Co-Win वर कागदपत्रांची तपासणी
यानंतर लसीकरण ऑफिसर -2 Co-Win अॅपवर तुमच्या कागदपत्रांची तपासणी करतील.
5) लस दिली जाईल –
सर्व तपासण्या झाल्यानंतर तुम्हाला कोविड -19 लस दिली जाईल.
6) 30 मिनिटे थांबावे लागेल –
लस दिल्यानंतर तुम्हाला निरीक्षण कक्षात 30 मिनिटे थांबावे लागेल.
7) ऑफिसर 4 आणि 5 लक्ष ठेवतील –
लसीकरण अधिकारी 4 आणि 5 आर्धा तासापर्यंत तुमच्यावर लक्ष ठेवतील. तसेच नोंदणी नसलेल्या लाभार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
8) दुसरा डोस –
यानंतर तुम्हाला दुसऱ्या डोससाठी यावे लागेल. तुम्हाला SMS द्वारे तारीख सांगितली जाईल.