पिंपरी (प्रतिनिधी) – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस कॉम्रेड सिताराम येचुरी यांना पिंपरी चिंचवड शहरातील पुरोगामी पक्ष संघटना, महविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतर्फे आकुर्डी येथील श्रमशक्ती भवन येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
काहींनी त्यांचे प्रत्यक्ष गाठीभेटीचे अनुभव सांगितले. येचुरी यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड शहरात अभ्यास केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेत आहोत, असे मानव कांबळे यांनी श्रद्धांजली सभेत जाहीर केले.
यावेळी माजी महापौर संजोग वाघेरे म्हणाले की, संसदेमध्ये ते अभ्यासपूर्ण भाषणे करायचे, त्यांच्या निधनाने विद्यार्थी, शेतकरी आणि कष्टकरी यांच्या हितासाठी आयुष्यभर झटणारा एक विचारवंत, तत्वनिष्ठ नेता देशाने गमवला आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला शहराध्यक्षा ज्योती निंबाळकर म्हणाल्या की, सिताराम येचुरी यांचा जीवन संघर्ष निवडणूक किंवा सत्तेचा विषय नव्हता. धर्म निरपेक्ष तर विचारधारेची लढाई होती. ते राज्यसभेतील त्यांची भाषणे जनतेच्या समस्या सरकार समोर मांडणारी होती.
यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अनिल रोहम, आपचे स्वप्निल जेवळे, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या अपर्णा दराडे, बारा बलुतेदार संघटनेचे प्रताप गुरव, काँग्रेसचे जितेंद्र छाबडा, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष प्रवीण कदम,
संजय जाधव, प्रदीप पवार, डॉमनिक लोबो, सतीश नायर, अविनाश लाटकर, देविदास जाधव, पोन्नपन, बाबासाहेब देशमुख, मुकेश आंबटकर यांनी श्रद्धांजली वाहिली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव प्रास्ताविक गणेश दराडे यांनी प्रास्ताविक केले. देविदास जाधव यांनी आभार मानले.