पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर टाकण्यात आलेल्या सहकारी संस्थाच्या निवडणुकांचा बिगुल नवीन वर्षात वाजणार आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसह, इतर 21 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका, नागरी बॅंका, साखर कारखाने, दूध संघ, कार्यकारी सोसायट्या अशा सुमारे 30 हजार संस्थांच्या निवडणुका या नवीन वर्षात होणार आहे. त्यामुळे नवीन वर्ष हे सहकार क्षेत्रातील निवडणुकांनी गाजणार आहे.
करोनाचा प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका तीन महिने लांबणीवर टाकण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. यापूर्वी तीनदा निवडणूक पुढे ढकलण्यासंदर्भातील आदेश काढण्यात आला. त्यानुसार दि. 31 डिसेंबर 2020 पर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या.
आता ही मुदत समाप्त होत आहे. तसेच आता राज्यात करोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. राज्य निवडणूक आयोगानेदेखील ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आता सहकार क्षेत्रातील संस्थांच्या निवडणुका या नवीन वर्षात होणार असल्याची माहिती सहकार विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.