पुणे – जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका होत नाही, तोच आता सहकारी संस्थांचे बिगुल वाजले आहे. पुणे जिल्ह्यात डिसेंबर अखेरपर्यंत सुमारे 3 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात 195 सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहे. यामुळे यंदाचे वर्ष हे सहकारी संस्थांच्या निवडणुकांनी गाजणार आहे.
आधी कर्जमाफी त्यानंतर आलेले करोनाचे संकट यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसह इतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका, नागरी बॅंका, साखर कारखाने, दूध संघ, कार्यकारी सोसायट्या अशा सुमारे 30 हजार संस्थांच्या निवडणुका होणार आहे.
ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांची मुदत उलटून गेली आहे. त्या सहकारी संस्थांच्या निवडणुका या प्राधान्याने घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यात सहा टप्प्यांत निवडणुका होणार आहे. आता प्रारुप मतदार यादी तयार करणे, त्यावर हरकती सूचना मागविणे व अंतिम मतदार यादी निश्चित करणे यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती सहकार विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात एक बॅंक, 79 विविध कार्यकारी सोसायट्या, 27 पतसंस्था, 21 सेवक पतपेढी, 18 मजुर संस्था, 9 पाणीपुरवठा संस्था या सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहे.