सहकारी बॅंकांना सांघिक पद्धतीने कर्ज वितरण करता येणार

जनता सहकारी बॅंकेचे लोन एक्‍सचेंज फोरम ऑनलाईन पोर्टल सुरू

पुणे – जनता सहकारी बॅंक, पुणे या मल्टिसस्टेट शेड्युल्ड बॅंकेने सुरू केलेल्या ऑनलाईन पोर्टल ( लोन एक्‍सचेंज फोरम)चे उद्‌घाटन रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (आरबीआय) चे संचालक सतिश मराठे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.

या ऑनलाइन कार्यक्रमाला राज्यातील विविध सहकारी बॅंकांचे अध्यक्ष, संचालक आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता. या प्रसंगी नॅशनल को-ऑप. फेडरेशनचे अध्यक्ष ज्योतिंद्रभाई मेहता, सहकार भारतीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. उदय जोशी, जनता बॅंकेचे अध्यक्ष माधव (अभय) माटे, उपाध्यक्षा अलका पेटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत काकतकर, महाव्यवस्थापक जगदीश कश्‍यप, उप महाव्यवस्थापक यांनी विनय दुनाखे आदी उपस्थित होते. मराठे म्हणाले, काळाची गरज लक्षात घेऊन जनता सहकारी बॅंकेने लोन एक्‍सचेंज फोरम हा अभिनव उपक्रम राबवला. या पोर्टलच्या माध्यमातून प्राधान्यक्रमाची कर्जे सहकारी बॅंकिंग क्षेत्रात राहतील असा मला विश्वास वाटतो.

या पोर्टलचा उपयोग सर्व सहकारी बॅंकांनी करून घ्यावा. पोर्टलच्या माध्यमातून कर्ज वितरण करताना सावधगिरी बाळगावी तसेच व्यवहारामध्ये पारदर्शकता ठेवावी. सहकारी बॅंकिंग क्षेत्रात कायम नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात जनता सहकारी बॅंक आघाडीवर असते याचे हे पोर्टल उत्तम उदाहरण आहे. सहकारी बॅंकांमधील कर्जव्यवहार हा देशभरातील सहकारी बॅंकांमध्येच रहावा यासाठी हा उपक्रम स्तूत्य असून याचा वापर सहकारी बॅंकांनी करून घ्यावा असे मेहता यांनी सांगितले.

उदय जोशी म्हणाले, या अभिनव पोर्टलमुळे सहकारी बॅंकांना सांघिक पद्धतीने कर्ज वितरण करणे सहज शक्‍य होणार आहे. या आधुनिक पोर्टलचा उद्देश विषद करताना काकतकर म्हणाले, जनता बॅंकेने स्वत: या पोर्टलची निर्मिती केली आहे. ही निर्मिती करताना सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. ज्या बॅंकेला यामध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांना येथे नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी झाल्यानंतर त्यांना कर्ज व्यवहारामध्ये सहभागी होता येणार आहे. सहकारात सहकार वाढविण्याची संधी या पोर्टलद्वारे जनता बॅंकेने महाराष्ट्रातील तसेच देशातील सहकारी बॅंकांना करून दिली आहे. याचा फायदा सर्वांनी करून घ्यावा असे बॅंकेचे अध्यक्ष माधव माटे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.