पुणे –पेट्रोल आणि डीझेलच्या दराने शंभरी पार केल्याने गेल्या काही दिवसांपासून खासगी वाहनधारकांनी तुलनेने पेट्रोल-डीझेलच्या तुलनेत स्वस्त असलेल्या सीएनजीचा वापर करण्यासाठी वाहनांना त्याचे किट बसविणे तसेच सीएनजीवरील नवीन वाहने घेण्यास सुरूवात केली होती. मात्र, हा पर्याय वाहनधारकांना औटघटकेचा ठरण्याची चिन्हे असून सीएनजीची दरवाढही थांबण्यास तयार नाही.
शहरात बुधवारी सीएनजी दरात 2 रुपयांची वाढ झाली असून तो आता 75 रुपयांवर पोहोचला आहे. या दरवाढीमुळे रिक्षाचालक आणि स्कूलबस चालकही हैराण झाले आहेत. शहरात सीएनजीचे दर 68 रुपये असताना राज्य शासनाकडून सीएनजीवरील व्हॅट 3 टक्केच ठेवला. त्यामुळे सीएनजीच्या दरात सुमारे सहा रुपयांची सवलत मिळून 1 एप्रिलपासून शहरात सीएनजी 62 रुपये प्रतीकिलो मिळत होता. त्यानंतर गेल्या 20 दिवसांत सीएनजीमध्ये जवळपास 13 रुपयांची वाढ झाली असून सीएनजीचे दर 75 रुपयांवर गेले आहेत.
रिक्षाचालक हैराण
सीएनजीच्या सततच्या दरवाढीने रिक्षाचालक चांगलेच हैराण झाले आहेत. महापालिकेकडून शहरात पर्यावरण संवर्धनासाठी रिक्षांना सीएनजी कीट बसविण्यासाठी 12 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले. त्यानंतर शासनानेच रिक्षांना सीएनजी असणे बंधनकारक केले. त्यामुळे शहरातील जवळपास सर्व रिक्षा तसेच पीएमपीच्या अनेक बसेसही सीएनजीवर आहेत. याशिवाय, अनेक नागरिकांनी पर्यावरण संवर्धनासोबतच इंधनाचे वाढते दर परवडत नसल्याने सीएनजी वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. मागील दोन वर्षांपूर्वी सीएनजीचे दर 45 ते 55 रुपयांच्या आसपास होते. त्यामुळे तो परवडत होता. मात्र, आता हा दर 75 पर्यंत वाढल्याने तसेच भविष्यात तो कमी होण्याची शाश्वती नसल्याने सीएनजी वाहनधारक चांगलेच हैराण झाले आहेत.