पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात घरफोड्या करणाऱ्या “सीएम’ टोळीच्या चार जणांना गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी अटक केली. या टोळीकडून तब्बल 381 ग्रॅम सोन्याचे दागिने, एक किलो चांदीचे दागिने आणि अन्य साहित्याचे असा एकूण 19 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चंद्रकांत ऊर्फ सीएम अनंत माने (वय 20), राजू शंभू देवनाथ ऊर्फ राजू बंगाली (वय 20, दोघेही रा. वेताळनगर, चिंचवड), राम ऊर्फ रामजाने लक्ष्मण क्षीरसागर (वय 26, रा मु.पो. वाधोली गौर, ता. कळंब, जि. उस्मानाबाद), अमोल ऊर्फ भेळ्या अरुण माळी ऊर्फ घुगे (वय 27, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी नारायण जाधव आणि लक्ष्मण आढारी यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रेकॉर्डवरील तडीपार असलेला सराईत घरफोड्या करणारा आरोपी चंद्रकांत ऊर्फ सीएम याला उस्मानाबाद जिल्ह्यातून ताब्यात घेतले. आरोपींना विश्वासात घेऊन चौकशी केली असता आपल्या टोळीने मागील तीन महिन्यांत नऊ घरफोड्या केल्याचे सांगितले.
यामध्ये चोरलेले 381 ग्रॅम सोन्याचे, 1 किलो चांदीचे आणि घरफोडीतील अन्य साहित्य असा एकूण 19 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या सराफाचा पोलीस शोध घेत आहेत. या कारवाईमुळे चिंचवडमधील दोन, निगडी चार, देहूरोड दोन आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एक असे एकूण नऊ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.