अहमदाबाद – गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आज गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेत त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. गुजरात विधानसभा निवडणुकांना अवघे एक वर्ष उरले असताना रुपाणी यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राजीनामा दिल्यानंतर रुपाणी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्षातील जबाबदाऱ्या बदलणे ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे म्हंटले. तसेच ५ वर्षांच्या कालावधीसाठी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिल्याबाबत पक्षाचे आभार देखील मानले.
“भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे मार्गदर्शन माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे. यापुढे माझ्यावर जी काही जबाबदारी सोपवली जाईल ती मी पार पाडेन. आम्ही ‘पद’ नाही ‘जबाबदारी’ म्हणतो. मला जी जबाबदारी देण्यात आली होती ती मी पार पाडली. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढतो आणि २०२२च्या निवडणुकाही त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या जातील.” असं रुपाणी म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘होम ग्राउंड’ असलेल्या गुजरातेत २०२२ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी रुपाणी यांनी दिलेला राजीनामा अनपेक्षित मानला जातोय. रुपाणी यांच्या पाठोपाठ त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने देखील राजीनामा दिला आहे.
या घटनाक्रमानंतर गुजरातमध्ये भाजपपुढे आता तीन मार्ग उरले आहेत. पहिला मार्ग म्हणजे भाजपला राज्यात रुपाणी यांच्या जागी नवा चेहरा आणावा लागेल व नवे मंत्रिमंडळ स्थापन करावे लागेल. दुसरा पर्याय राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल व तिसरा पर्याय राज्यात मुदतपूर्व निवडणुका घ्यावा लागतील.
भाजप पहिला मार्ग निवडण्याची शक्यता अधिक असून रुपाणी यांच्या जागी नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेले मनसुख मांडवीय त्यांची जागा घेतील अशी शक्यता आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचे नाव देखील असेल.
पक्षातील सूत्रांनी देखील मुदतपूर्व निवडणुकांची शक्यता फेटाळून लावली असून निवडणुकांपूर्वी राज्यात भाजपने ‘खांदेपालट’ केली असल्याचं म्हटलंय.