भंडारा अग्नी तांडव: “हलगर्जीपणा करणाऱ्यांना सोडणार नाही”

भंडारा – येथील जिल्हा रुग्णालयाच्या नवजात अर्भकांच्या वॉर्डला लागलेल्या आगीच्या प्रकरणात कोणालाही मुद्दाम आरोपी करणार नाही. पण, यात हलगर्जीपणा करणाऱ्यांना सोडणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारी येथे केले.

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षाला शनिवारी पहाटे भीषण आग लागली होती. यामध्ये दहा चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता. याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दुपारी रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी या आगीत मरण पावलेल्या अर्भकांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

तेथील नवजात बालकांपैकी सात बालकांना वाचवण्यात यश आले. मृत बालके एक ते तीन महिने वयाची होती. त्यांत आठ मुली आणि दोन मुलगे होते. रुग्णालय परिसरात मृत बालकांच्या माता टाहो फोडत होत्या. त्यांच्या आक्रोशाचे दृश्‍य हृदय पिळवटून टाकणारे होते. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

या दुर्घटनेत मरण पावलेल्या बालकांच्या कुटुंबियांना भेटलो. त्यांचे सांत्वन करण्याच प्रयत्न केला. त्यांचे कितीही सांत्वन केले तरी गेलेला जीव परत आणता येत नाही. मात्र हा प्रकार अचानक घडला की वारंवार तक्रारी येत असूनही अनास्थेमुळे दुर्लक्ष केल्याने घडले याची माहिती घेण्यात येत आहे. त्याचीही संपूर्ण चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. त्याची जबाबदारी विभागीय आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करताना कोणालाही मुद्दाम आरोपी करणार नाही पण दुर्लक्ष करणाऱ्यांना सोडणार नाही. या समितीत मुंबई पालिकेच्या अग्निशमन दलातील वरीष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ते सूचना देतील. राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

या दुर्घटनेमुळे राज्यासह अवघा देश हळहळला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या दुर्घटनेबाबत शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृत बालकांच्या पालकांना पाच लाखांची मदत जाहीर केली.

‘आज आम्ही या पीडित कुटुंबांना भेटलो यावेळी त्यांचं सांत्वन करताना त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहण्याशिवाय आमच्याकडे कुठलेही शब्द नव्हते. या प्रकरणाची चौकशी तर झालीच पाहिजे. पण ही दुर्घटना अचानक घडली की आधी अहवाल आल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं हे तपासलं जाईल,’ असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.