मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आता लॉकडाऊन आणि नॉकडाऊनही नको’!

मुंबई – करोना काळातही संपूर्ण काळजी घेऊन महाराष्ट्राने उद्योग चालवून दाखविले, असे उदाहरण मला देशात निर्माण करायचे आहे. कामगारांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेऊन उद्योग सुरू करावेत. आपल्याला लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नकोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.

राज्यातील प्रमुख उद्योजकांसोबत दूरदृश्‍य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी, डॉ. संजय ओक व उद्योजक उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईत ज्या पद्धतीने करोना साथीची परिस्थिती हाताळली गेली, त्याची जगात प्रशंसा होत आहे. अजूनही करोनाचे संकट टळलेले नाही. दीड वर्षात करोना परिस्थितीला हाताळण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. मात्र, त्याच दरम्यान करोना विषाणूचे स्वरूप बदलल्याने अधिक काळजी घेणे आवश्‍यक आहे.

अनलॉक करताना आपण कॅलक्‍युलेटेड रिस्क घेत आहोत. त्यामुळे काळजी घ्या. एकदम काहीही शिथिल केलेले नाही. त्यासाठी काही निकष आणि पातळ्या ठरविल्या आहेत. निर्बंध किती शिथिल करायचे किंवा कडक याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन निर्णय घेतील. “साप भी मरे और लाठी भी ना तुटे’ असे आपल्याला वागावे लागेल.

यूकेतील विषाणूसारखे किंवा त्यापेक्षाही जास्त धोकादायक पद्धतीने आपल्याकडे संसर्ग वाढला आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊन करावे लागले, नाहीतर करोनाने आपल्याला नॉकडाऊन केले असते, अशा मोजक्‍या शब्दांत त्यांनी करोनाच्या गांभीर्याबद्दल सांगितले.

आता आपल्याला लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नको आहेत. यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, कामगारांचे लसीकरण, पाळ्यांमध्ये काम करणे, वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देणे या गोष्टी कराव्या लागणार आहेत. याशिवाय ज्या लोकांना कामावर येणे आवश्‍यक आहे त्यांच्यासाठी “बायोबबल’ तयार करण्यात यावा. यात आवश्‍यक कामगारांना कामाच्याच ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात यावी.

ज्याप्रमाणे आरोग्यासाठी फिल्ड सुविधा उभारल्या तसे उद्योगांनी त्यांच्या भागात कामगार व कर्मचारी यांच्यासाठी तात्पुरत्या निवास सुविधा उभाराव्यात; तसेच वैद्यकीय व इतर आवश्‍यक सुविधा यांचे नियोजन करून ठेवावे. यासाठी शासनाकडून आवश्‍यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.