सोलापूर – आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली आहे. शासकीय महापुजेसाठी उद्धव ठाकरे भर पावसात स्वत: ड्रायव्हिंग करत पंढरपुरात दाखल झाले होते. दरम्यान टेंभुर्णीहून पंढरपूरला जात असतानाच तालुक्यायील आजोती पाटीजवळ एक दुचाकी स्लिप होऊन त्यावरील दोघेजण जखमी होऊन खाली पडले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या प्रसंगावधानामुळे दोन अपघातग्रस्त तरुणांचे प्राण वाचले आहेत.
सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपूरला जात असताना एक दुचाकी स्लिप होऊन त्यावरील दोघेजण जखमी होऊन खाली पडले होते. ही घटना लक्षात येताच मुख्यमंत्री ठाकरे यांनी तात्काळ अपघात ग्रस्तांना रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना दिल्या. यासाठी त्यांच्या ताफ्यातील वाहनातूनच दोन्ही अपघातग्रस्तांना पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जखमींची प्रकृती स्थिर आहे. पंढरपुरात गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या दोन तरुणांच्या प्रकृतीची चौकशीदेखील केली. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीमुळे त्यांचे सर्वीकडून कौतुक होताना दिसून येत आहे.