मुख्यमंत्रीच ठरवणार सेनेचे उमेदवार

कोकणातील राष्ट्रवादीचे बाहूबली अखेर शिवसेनेत दाखल

मुंबई : शिवसेनेच्या उमेदवारांची यादी मुख्यमंत्र्यांकडून येईल. त्यानंतर आमचे नेते त्यावर विचार करतील, अशा उपहासात्मक शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी टोलेबाजी केल्याने भाजप – सेनेच्या युतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

भाजपा सेना युतीच्या 30 वर्षांच्या वाटचालीत महाराष्ट्रात सेना तर केंद्रात भाजपा मोठा भाऊ असे राजकीय समिकरण ठरले होते. मात्र, 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने सेनेसोबतची युती तोडली. भाजपा विधानसभेत मोठा पक्ष ठरला. त्यानंतर सेनेने सत्तेत राहताना विरोधी पक्षाचीच भूमिका वठवली. त्याला भाजपाकडून विरोध झाला नाही. लोकसभा निवडणुकीत युती व्हावी म्हणून भाजपाने पुढाकार घेतला. शिवसेनेला एक अधिकची जागा देउ केली. मात्र, शिवाजीराव आढळराव, आनंदराव आडसूळ आणि चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाल्याने सेना जागावाटपात बॅक फूटवर गेल्याचे मानले जात आहे.

या पार्श्‍वभूमीवर भास्कर जाधव यांच्या पक्षप्रवेशावेळी उध्दव ठाकरे यांनी केलेल्या या विधानाने राजकीय क्षेत्रात उलट सुलट अर्थ काढले जात आहेत. ठाकरे यांच्या उपस्थितीत भास्कर जाधव यांनीकार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार संजय राऊत, सचिव मिलिंद नार्वेकर यावेळी उपस्थित होते.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांचे तुम्ही लाडके होता, असेही ठाकरे यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये माझे कोणाशीही वाद झालेले नाहीत. मी हाडाचा शिवसैनिक आहे.त्यामुळे मी अस्वस्थ होतो. त्यामुळे मी माझ्या मूळ घरी परतलो, असे जाधव यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)