पिंपरी – खासदार संजय राऊत यांनी डॉक्टर व जागतिक आरोग्य संघटनेवर केलेल्या बाष्कळ विधानाचा नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) महाराष्ट्र राज्य शाखेने तीव्र निषेध केला आहे. या पूर्वीही आयुर्वेदिक उपचाराविषयी चुकीचा संदेश जाईल, असे चुकीचे वक्तव्य केले होते. लोकांचा पक्ष म्हणून शिवसेनेविषयी सर्वसामान्य माणसाला आदराची आणि आपलेपणाची भावना आहे. परंतु एका सेना खासदाराने वारंवार डॉक्टर आणि आयुर्वेदिक सारख्या भारतीय आणि पुरातन चिकित्सा पद्धतीवर उपहासात्मक व्यंग करणे अत्यंत निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार राऊत यांना थोडा आवर घालावा, अशी मागणी निमा संघटनेनी केली आहे.
निमा संघटनेने म्हटले आहे की, करोनाच्या भयंकर परिस्थितीतही अनेक डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. अनेकांना या आजारामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक डॉक्टर या आजाराला बळी पडले आहेत. अशाही परिस्थितीत सर्व जण वैद्यकीय सेवा पुरवित आहेत. अशा परिस्थितीत डॉक्टरांबद्दल बेताल वक्तव्ये करणे योग्य नाही.
आधीच समाजात विविध अफवांमुळे डॉक्टर बदनाम होत आहेत. कॉर्पोरेट रुग्णालयाच्या अवास्तव बिलाचे खापर डॉक्टरवर फोडून त्यांची बदनामी होत आहे. समाजातील डॉक्टरांची प्रतिमा मलीन करण्यात अशी बिनबुडाची वक्तव्ये हातभारच लावत असल्याने खासदार राऊत यांचा निषेध करत असल्याचे निमा संघटनेच्या सदस्यांनी सांगितले.