मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख मुख्यमंत्री असा केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शिंदे यांना आपण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री असल्याचा विसर पडला की त्यांनी जाणीवपूर्वक असा शब्दप्रयोग केला अशा प्रकारच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. गोरेगाव येथे पार पडलेल्या कोकण महोत्सवादरम्यान शिंदे यांनी सर्वांना बुचकळ्यात पाडणारे विधान केले.
मुंबईतील कोकण महोत्सवाला मुख्यमंत्री शिंदेंनी हजेरी लावली. यावेळी भाषणादरम्यान शिंदे यांनी ‘राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी..’ असा उल्लेख केल्याचे दिसून आले. यानंतर सोशल मीडियासह माध्यमांवर शिंदेंनी केलेल्या या विधानावरून जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर धक्कातंत्राचा वापर करत भाजपने मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले. त्यानंतर विरोधकांनी शिंदे हे केवळ नावाला मुख्यमंत्री असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सर्व महत्वाचे निर्णय घेत असल्याची टीका वारंवार केली होती. यानंतर आता एकनाथ शिंदेंनी असे विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळात विवध चर्चांना उधाण आले आहे. आता विरोधक याबाबत काय भाष्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.