मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (दि. १४) मुंबई पोलिस आयुक्त कार्यालय येथे पार पडलेल्या बैठकीत मुंबई शहराच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांच्या सुरक्षेच्या बाबतीत विविध उपाययोजना करण्याच्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाची पाहणी करून मुंबईच्या सुरक्षेची खातरजमा केली.
तसेच, त्यांनी २४ तास कार्यरत असणाऱ्या नियंत्रण कक्षातील CCTV यंत्रणा, ड्रोनचा वापर याबाबत माहिती घेतल्यानंतर या यंत्रणेच्या माध्यमातून गुन्हेगारी प्रवृत्तीवर नजर ठेवण्याच्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, यावेळी गृहमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.