“रोड शो’ला, आख्खी भोसरी लोटल्यासारखे वाटले – मुख्यमंत्री

भोसरी – भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी भोसरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या “रोड शो’चे आयोजन करण्यात आले होते. या “रोड शो’ला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. “एकच वादा, महेश दादा’ अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता.

भोसरी पीएमटी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हार घालून या “रोड शो’ला सुरुवात करण्यात आली. या “रोड शो’मध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, माजी महापौर नितीन काळजे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, प्रदेश भाजपच्या उमा खापरे, शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे आदी सहभागी झाले होते.

यावेळी मतदारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुमचा आशीर्वाद पंतप्रधान मोदींना आहे का? तुमचा आशीर्वाद भाजप सेनेच्या विचारांना पक्का आहे का? तुमचा आशीर्वाद महेशदादा लांडगेंना आहे का? असे प्रश्‍न विचारले. त्यास उपस्थितांना “हो’ म्हणत जोरदार प्रतिसाद दिला. भोसरीच्या “रोड शो’ ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रभावित झाले त्यांनी चिंचवड येथील सभेत या “रोड शो’चा उल्लेख केला. मी भोसरीत “रोड शो’ केला, अख्खी भोसरी लोटल्यासारखे वाटत होते, अशा शब्दात या “रोड शो’चे कौतुक फडणवीस यांनी केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.