मावळची जनता बाळा भेगडेंना दुप्पट मतांनी निवडून देणार

बाळा भेगडे होणार कॅबिनेटमंत्री होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

तळेगाव दाभाडे – गेल्या निवडणुकीत अधिक मताधिक्‍यांनी बाळा भेगडे निवडून आले होते. या निवडणुकीत त्याहून दुप्पट मतांनी मावळातील मतदारांनी निवडून आणल्यास त्यांना राज्यमंत्री पदावरून बढती देऊन कॅबिनेट मंत्री करतो, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्‍त केला.

तळेगाव दाभाडे येथे आयोजित मावळ विधानसभा मतदारसंघाच्या प्रचार सभेत ते बोलत होते. या वेळी राज्यमंत्री आणि मावळ विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार संजय उर्फ बाळा भेगडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार दिगंबर भेगडे, रुपलेखा ढोरे, रवींद्र भेगडे, संतोष दाभाडे उपस्थित होते. मुख्यमंत्री यांचे उपस्थितीत कात्रज दूध संघाचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक संचालक बाळासाहेब नेवाळे आणि पंचायत समितीचे दत्ता शेवाळे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपात प्रवेश करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या जनसमुदयात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विधानसभा निवडणुकीचा निकाल चार महिने आधीच लागला आहे. मतदारांनी क्रांती करून या निवडणुकीत काय होणार हे आधीच सांगितले. 15 वर्ष सत्तेत असताना आघाडीने केवळ भ्रष्टाचार केला आणि स्वतःची कमाई केली आहे. विरोधकांनी 15 वर्षांचा हिशोब द्यावा, मी पाच वर्षांचा हिशोब देतो. राज्यात 50 लाख शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. राज्यात शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत, दुष्काळ मदत, कर्जमाफी दिली आहे. त्याचप्रमाणे पाच वर्षांत 50 हजार कोटी शेतकऱ्यांना दिले आहेत. सिंचन कामे केली, पूर भागातील पाणी दुष्काळ भागात नेण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना माध्यमातून 30 हजार किलोमीटर रस्ते तयार केले. हजारो कोटी रुपये खर्च करून पालखी मार्ग काम वेगाने होत आहे. गरिबांसाठी 7 लाख घरे निर्माण केली, 2021 पर्यंत कोण बेघर राहणार नाही, असा संकल्प केला आहे. विविध गावठाण मधील जमिनी नियमित करणे निर्णय घेतला आणि तीन लाख घरे अधिकृत केली आहे. राज्यातील सर्व शहरे हागणदारीमुक्‍त केली, पिण्याचे पाणी, भुयारी गटारे कामे करण्यात येत आहे.

राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले की, छत्रपती यांचा मी मावळा असून, गद्दारी कोणाच्या रक्तात आहे? हे मतदारांना विरोधी उमेदवारी वरून दिसून आले आहे. मिसाईल प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण प्रश्‍न आणि बैलगाडा शर्यत हे दोन प्रश्‍न बाकी असून, मुख्यमंत्री यांनी त्यात पुढाकार घ्यावा. रोजगार आणि पर्यटन याकरिता पुढील काळात प्राधान्याने काम करण्यात येईल.

मावळला कॅबिनेट पद द्या – 
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पार्सल लोकसभा निवडणुकीत बारामतीला पाठवले आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला उमेदवार न मिळाल्याने त्यांनी आमच्यातील एकाला उमेदवारी दिली. त्यामुळे खऱ्या अर्थाने हजारो मतांनी संजय भेगडे विजयी होतील, असे मत खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्‍त केले. आगामी निवडणूकमध्ये बाळा भेगडे यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात यावे, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)