मुंबई – शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आता दसराऱ्याला होणारा शिवाजी पार्कमधील मेळावा नेमकं कोण घेणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. शिंदे गट देखील शिवतीर्थावर दसऱ्याला मेळावा घेण्याच्या तयारीत आहे असे वृत्त माध्यमांमध्ये प्रसारित झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याबाबत भाष्य केलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरी गणपती दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवास साधला.
“दसरा मेळावा जवळ येतोय तर बाळासाहेबांचे दोन शिवसैनिक एकाच व्यासपीठावर दिसतील का?” असा प्रश्न यावेळी शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना शिंदे यांनी, “आता गणपती आहे. नंतर नवरात्रौत्सव येतोय. त्यानंतर दसरा आहे. आता मध्ये नवरात्री आहे ना? तुम्हाला एकदम सांगितलं तर कसं चालेल,” असं मिश्किल उत्तर दिलं.
गणपती बसल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटी गाठीचे सत्र वाढत चालले आहे. नारायण राणे यांच्या जुहू येथील निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावत बाप्पाचे दर्शन घेतले. दर्शनानंतर मुख्यमंत्र्यांनी राणेंसह माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माजी खासदार निलेश राणेंसह आमदार नितेश राणे देखील उपस्थित होते.