Devendra Fadnavis: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला जवळपास दीड महिना उलटला आहे. या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच, यासाठी सरकारकडून विशेष वकिलाची नेमणूक केली जावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. हे प्रकरण ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपवावे, अशी मागणी केली जात आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. उज्ज्वल निकम यांना याबाबत विनंती करण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
उज्जवल निकम यांच्या नियुक्तीबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात त्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी आमच्याकडे येत होती. त्यानंतर आम्ही उज्जवल निकम विनंती केली आहे. ते सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वास आहे.
उज्ज्वल निकम हे प्रकरण घेण्यास नकार का देत आहे, याचे कारण देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. ते म्हणाले की, उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे की, माझी नियुक्ती केल्यानंतर काही लोक विनाकारण राजकारण करतात. राजकीय रंग देण्याचं काम करतात, हे योग्य वाटत नाही.
देशात अनेक वकील आहेत. ते वेगवेगळ्या पक्षात आहेत. त्याचं राजकारण होत नाही. परंतु उज्वल निकम यांच्या नियुक्तीला राजकारण करणं कुठंतरी गुन्हेगारांना मदत करण्यासारखं आहे. कारण उज्वल निकाम यांचा इतिहास आहे, की त्यांनी केस घेतल्यावर गुन्हेगारांना शिक्षा होते, असंही यावेळी ते म्हणाले.
तसेच, संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना फडणवीस म्हणाले की, कुठल्याही प्रकारे तपास यंत्रणांवर दबाव न आणता तपास यंत्रणांना आपण काम करू दिलं पाहिजे. तसेच मी एवढंच आश्वासन देतो की कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही दोषी व्यक्तीला सोडलं जाणार नाही.