दिल्ली – दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शीला दीक्षित गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने फोर्टीस एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
दिल्लीच्या तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दीक्षित यांच्या निधनाचे वृत्त समजताच देशभरातील राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवरुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ‘नुकतंच शीला दीक्षित यांच्या निधनाचं धक्कादायक वृत्त समजलं. दिल्लीच्या विकासात त्यांचं मोठं योगदान होतं. त्यांच्या जाण्याने दिल्लीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे योगदान कायमच स्मरणात राहिल. माझी सहवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. त्यांच्या आत्म्याला शांतता लाभो.’ अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले.
Just now got to know about the extremely terrible news about the passing away of Mrs Sheila Dikshit ji. It is a huge loss for Delhi and her contribution will always be remembered. My heartfelt condolences to her family members. May her soul rest in peace
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) July 20, 2019
सलग तीनवेळा दिल्लीच्या मुख्यमंत्री
दिल्लीचं दिर्घकाळ मुख्यमंत्रीपद त्यांनी भुषवलं होतं. त्यांनी तब्बल १५ वर्ष दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा भार सांभाळत एक नवा विक्रम आपल्या नावावर केला होता. साल 1998 पासून सलग तीन वेळा त्या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर निवडून आल्या होत्या. परंतु 2013 साली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा दिल्ली विधानसभा मतदारसंघात पराभव केला होता.