संगमनेर – शहरात वारंवार होणाऱ्या धूम स्टाइल गंठण चोरीच्या प्रकारांमुळे येथील महिलांना दागिने घालून घराबाहेर पडणे अवघड बनले आहे. रविवारी अशाच एका चोरीच्या प्रकारात महिलेच्या गळ्यातील सुमारे 1 लाख 86 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात दुचाकीस्वार चोरट्याने ओरबाडून पोबारा केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सुनिता संपत शिंदे (वय 46, रा. साईश्रद्धा चौक, सनराईज टाउनशिप,संगमनेर) ही महिला रविवारी दुपारी कोल्हार घोटी राज्यमार्गावरील सिद्धिविनायक लॉन्स या ठिकाणी पाहुण्यांच्या लग्न समारंभासाठी गेल्या असता दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 62 हजार रुपये किमतीचे 2 तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण आणि 1 लाख 24 हजार रुपये किमतीचे 4 तोळे वजनाचे गंठण असा एकूण 1 लाख 86 हजार रुपये किमतीचे दागिने ओरबाडून चोर पसार झाले. याबाबत शिंदे यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.