विज्ञानविश्‍व : क्‍लोव्हिस धूमकेतू

मेघश्री दळवी

माणसाच्या इतिहासाच्या ज्या काही नोंदी उपलब्ध आहेत, त्याच्यापूर्वी काय घडलं असेल याची जिज्ञासा तुम्हा-आम्हाला असते तशी ती शास्त्रज्ञांनाही असते. कधी त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पुरावे मिळत असतात, तर कधी केवळ वेगवेगळ्या संदर्भातून उलगडत जाणारे दुवे. अशाच काही दुव्यांच्या अभ्यासावरून शास्त्रज्ञांच्या जगात अलिकडे एका नव्या संशोधनाची चर्चा होते आहे, आणि ती म्हणजे क्‍लोव्हिस धूमकेतूची. वैशिष्ट्‌य म्हणजे हवामानशास्त्र, भूगर्भशास्त्र, खगोलशास्त्र, पुरातत्वशास्त्र, भौतिकशास्त्र, अशा अनेक शाखांमधले शास्त्रज्ञ या चर्चेत सहभागी होत आहेत. याला कारण अर्थात या धूमकेतूचा काळ. सुमारे 12,800 वर्षांपूर्वी क्‍लोव्हिस ही एक उत्तर अमेरिकेतील पॅलिओ-इंडियन जमात अचानक आणि पूर्णपणे नष्ट झाली. तिचं कारण शोधता शोधता या धूमकेतूचा विचार पुढे आला, म्हणून त्याला क्‍लोव्हिस धूमकेतू म्हटलं जातं आहे.

आजपासून सुमारे तेरा हजार वर्षांपूर्वी क्‍लोव्हिसने पृथ्वीला भेट दिली आणि ही भेट खरोखरीच अशक्‍यप्राय वाटणाऱ्या घटनांनी भरलेली होती. अंतराळातून प्रवास करत क्‍लोव्हिस पृथ्वीच्या जवळ आला तेव्हा त्याचे तुकडे तुकडे झालेले होते. आकाशात हे तुकडे काही दिवस सतत दिसत होते. त्यातले काही पृथ्वीच्या वातावरणात शिरले तेव्हा आणखी विखुरले, घर्षणाने जळाले, आणि त्यांचा वर्षाव काही दिवस होत होता. क्‍लोव्हिसचे काही मोठे तुकडे पृथ्वीच्या पृष्ठभागावर आदळले.

या तुकड्यांचा आघात इतका जबरदस्त होता, की आपल्या हवामानावर त्याचा कायमचा परिणाम झाला. याच काळात पृथ्वीवर तापमान एकदम घटलं. खरं तर त्या सुमारास अखेरचं हिमयुग संपत चाललं होतं. उत्तरेकडचे हिमसाठे ध्रुवीय प्रदेशाकडे सरकत होते. आशिया आणि आफ्रिका खंडात तापमान वाढायला लागलं होतं. अशा वेळी अचानक पृथ्वीचं तापमान झटक्‍यात आठ अंशाने खाली गेल्याचे पुरावे मिळाले आहेत. त्यावेळी पुन्हा एकदा माणसांना हिमतडाख्याच्या अनुभवला सामोरं जावं लागलं. हे नक्की कशाने झालं,त्यामागे कोणती मोठी घटना असेल यावर अनेक दिशांनी संशोधन सुरू आहे. याचा संबंध क्‍लोव्हिस धूमकेतूशी असू शकेल असं आता समोर आलं आहे.

क्‍लोव्हिसच्या आघातामुळे लागलेल्या वणव्यांनी जगातलं एक दशांश जंगल जळून खाक झालं. त्यातून वाचलेल्या माणसांना आगीच्या प्रचंड झळा पुढले कित्येक दिवस सहन कराव्या लागल्या असतील असा अंदाज आहे. धूमकेतूत असलेले धातू बारीक तुकड्यांच्या स्वरूपात बऱ्याच मोठ्या प्रदेशात फेकले गेले, त्यांच्यामुळे किती प्राणी आणि माणसं जखमी झाले असतील, मृत्यू पावले असतील याचा अदमास घेणे कठीण आहे. त्याच काळात मास्टोडन हा हत्तीसारखा दिसणारा प्राणी, मॅमथ हा मोठया सुळयांचा अजस्र हत्ती, आणि धारदार दात असलेला सेबर टूथ टायगर हे हिमयुगीन प्राणी अचानक नामशेष झाले.

यामागचं गूढ उकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या मते त्याचा संबंधही क्‍लोव्हिस धूमकेतूच्या आघाताशी असण्याची शक्‍यता आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर प्लॅटिनम अतिशय कमी प्रमाणात मिळतं. मात्र क्‍लोव्हिस जमात राहायची त्या उत्तर अमेरिकेतल्या प्रदेशात भरपूर प्लॅटिनम आढळतं. तेही क्‍लोव्हिसकडून मिळालेली देणगी आहे असा शास्त्रज्ञांचा तर्क आहे. पण मग क्‍लोव्हिसच्या आघाताने निर्माण झालेली विवरं कुठे आहेत?या आघाताच्या ठळक खुणा आजूबाजूच्या खडकांमध्ये का मिळालेल्या नाहीत? अशा प्रश्‍नांवर मात्र शास्त्रज्ञांचं एकमत नाही. पृथ्वीच्या इतिहासातल्या अनेक रहस्यांचा उलगडा क्‍लोव्हिसमुळे होत असला, तरी क्‍लोव्हिस धूमकेतूची सगळी रहस्यं मात्र अजून उलगडायची आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.