पुणे – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वादळाचा प्रभाव काही अंशी राज्यावर होत आहे. शहर परिसरातदेखील बुधवारी (दि.2) दिवसभर ढगाळ वातावरण होते. तापमानातदेखील वाढ होऊन थंडीचा प्रभाव कमी झाला आहे. परिणामी ऐन डिसेंबरमध्ये नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून, दिवसभर ढगाळ वातावरण आणि उकाडा जाणवत आहे. सर्वसामान्यपणे नोव्हेंबर-डिसेंबर या कलावधीत शहरात थंडीचे प्रमाण बऱ्यापैकी वाढते. यंदा मात्र नोव्हेंबरच्या सुरवातीचे दहा दिवस वगळता इतर सर्व दिवसांमध्ये ढगाळ वातावरण आणि उकाडा कायम होता. तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातदेखील हीच स्थिती राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
बंगालच्या उपसागरात लागोपाठ तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र- चक्रीवादळ हे महाराष्ट्रात थंडीसाठी अडसर ठरत आहेत. या वादळामुळे दक्षिण-पूर्व भागातून वाहणारे वारे आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांची सरमीसळ होऊन त्यांचा प्रभाव कमी होतो. पुढील दोन दिवस पुणे शहरात वातावरण ढगाळ राहील, मात्र पावसाची शक्यता नाही. त्यामुळे डिसेंबरमध्ये थंडीची अनुभूती घेण्यासाठी उत्सुक असणाऱ्या नागरिकांना आणखी काहीकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दरम्यान, बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शहरात कमाल तापमान 30.8, तर किमान 16.9 इतके नोंदवले. शहराच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत 4.5 अंश सेल्सिअस इतकी वाढ झाल्याची नोंद विभागाने घेतली आहे.