बारामती (प्रतिनिधी) – बारामती शहर व तालुक्यात नव्याने ३८ कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वेगाने होत असल्याने बारामतीकरांची चिंता वाढली आहे. नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व सॅनिटायझरचा व मास्कचा वापर करावा तसेच ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडू नये व घरातील तरुणांनी घरात आल्यानंतर सुद्धा नागरिकांपासून अंतर ठेवून असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
काल बारामती मध्ये एकूण 69 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 60 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून नऊ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत प्राप्त झालेल्या अहवालापैकी बारामती शहरातील नऊ व ग्रामीण भागातील 6 असे 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 44 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. व इतर तालुक्यातील एक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे पॉझिटिव आलेल्यांमध्ये टी सी कॉलेज येथील तीन जण, कल्याणी नगर तांदूळवाडी येथील दोन जण, देसाई इस्टेट येथील पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील दोन जण, तांबे नगर येथील एक रुग्ण व न्हावी गल्ली कसबा येथील एक रुग्ण असे शहरातील नऊ व मेडद येथील दोन रुग्ण व माळेगाव येथील एक रुग्ण, जळगाव क प येथील दोन रुग्ण, ढेकळवाडी येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील एक रुग्ण असे एकूण पंधरा रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तसेच बारामती येथील खाजगी प्रयोगशाळेमध्ये एकूण 88 अॅंटीजेन तपासणी करण्यात आल्या होत्या त्यामध्ये बारामती तालुक्यातील 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्यामध्ये बारामती शहरातील 12 व ग्रामीण भागातील अकरा अशा रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे काल दिवसभरात एकूण 15 rt-pcr व 23 अॅंटीजेनअसे एकूण 38 रुग्ण पॉझिटिव आढळून आलेले आहेत त्यामुळे बारामतीतील रुग्ण संख्या 385 झाली आहे.