कोयनानगर (वार्ताहर) : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेले 24 तास ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत असल्याने कोयना परिसर जलमय झाला आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ८५ हजार क्युसेक झाल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात २४ तासांत तब्बल सात टीएमसीने वाढ झाली आहे. धरण परिचालन सूचीपेक्षा जादा पाणीसाठा धरणात झाल्यामुळे वाढत जाणारी जलपातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरण प्रशासनाने धरणाचे ६ वक्र दरवाजे दीड फुटावर उघडून त्यातून नदीपात्रात ११०५० कुसेक पाणी सोडले होते.
मात्र, पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचा जोर कमी होत नसल्याने दीड फुटावर उघडलेले दरवाजे तीन फुटावर स्थिर करण्यात आले. त्यामुळे धरणातून नदीपात्रात २१०५० कुसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ८५ ,९३७ कुसेक आहे. धरणाची जलपातळी २१३९.०३ फूट झाली असून धरणात ७८.२९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण ७५ टक्के भरले असून पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची संततधार कायमच आहे.
गेल्या २४ तासांत पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे १६३ नवजा २३७ तर महाबळेश्वर येथे ३०७ मिलीमीटरम पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी दिवसभर पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर पाचपट वाढला आहे. पाणलोट क्षेत्रात ढगफुटी सदृश्य पावसाच्या सरीवर सरी कोसळत आहे. आज सकाळी आठपासून संध्याकाळपर्यंत कोयनानगर येथे ९० मिलीमीटर तर आतापर्यंत ३१४७ मिलिमीटर नवजा येथे ७० मिलिमीटर तर आतापर्यंत ३६९२ मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे ७७ मिलिमीटर व आतापर्यंत ३१८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या वक्र दरवाजातून मोठ्या प्रमाणात नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे दुथडी भरुन वाहणारी कोयना नदी धोकादायक स्थितीत वाहत आहे. प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.