नवी दिल्ली – हिमाचल प्रदेशातील शिमला येथे पुन्हा एकदा मुसळधार पावसाने धुमाकुळ घातला असून काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाउस झाला आहे. यामुळे काही दरड कोसळल्याने १३२ मार्ग बंद आहेत.
आतापर्यत पुराच्या ५१ घटनांमध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हवामान खात्याने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानसह 19 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
हिमाचल प्रदेशात 27 जून ते 16 ऑगस्ट दरम्यान ढगफुटी आणि अचानक आलेल्या पुराच्या 51 घटनांमध्ये 31 जणांचा मृत्यू झाला असून 33 जण बेपत्ता झाले, असे राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राने सांगितले.
लाहौल आणि स्पीतीमध्ये अशा 22 घटना घडल्या, ज्या राज्यात सर्वाधिक आहेत. तसेच किन्नौरमध्ये 11, उनामध्ये सहा, कुल्लू आणि मंडीमध्ये प्रत्येकी तीन, सिरमौरमध्ये दोन आणि चंबा, हमीरपूर, शिमला आणि सोलन जिल्ह्यात प्रत्येकी एक घटना घडली आहे.
हवामान खात्याने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गोवा, महाराष्ट्र, ओडिशा, झारखंड, बिहार, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळमध्ये 19 ऑगस्ट रोजी पावसाचा इशारा दिला आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा, हिमाचल प्रदेश आणि झारखंडमधील काही जिल्ह्यांमध्येही विजांचा कडकडाट अपेक्षित आहे. हवामान खात्याने ओडिशातील मच्छिमारांना समुद्र किनाऱ्यापासून अंतर राखण्यास सांगितले आहे. येथे 20 ऑगस्टपर्यंत पुराचा इशारा आहे.