इस्लामाबाद – पाकिस्तानच्या नीलम खोऱ्यात ढगफुटी झाली असून त्यामुळे आलेल्या पुरात किमान 23 जणांचे बळी गेल्याचे वृत्त आहे. हा भाग पाकिस्तान व्याप्त काश्मीरात येतो. खोऱ्यातील लसवा भागातील अनेक घरे या तुफानी पावसात आणि पुरांमध्ये वाहून गेली आहेत. काल रात्रभर येथे तुफानी पाऊस कोसळत होता. त्यात अपरिमित हानी झाली आहे. अनेक ठिकाणी दरडीही कोसळण्याचे प्रकार घडले असून अनेक ठिकाणी अद्याप मदत पथकांना पोहचता आलेले नाही. त्यामुळे नुकसानीचा नेमका अंदाज अद्याप आलेला नाही असे संबंधीत सूत्रांनी सांगितले.
राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सय्यद अलरहमान कुरेशी यांनी सांगितले की अनेक गावातील असंख्य लहान मुले आणि महिला बेपत्ता झाल्याच्या बातम्या आम्हाला मिळाल्या आहेत. लसवा भागाला यात मोठा फटका बसला असून तेथील मुख्य बाजारातील अनेक वास्तु यात जमीनदोस्त झाल्याचे पहायला मिळाले आहे. संपर्क यंत्रणा यामुळे पुर्ण विस्कळीत झाली असून फोन यंत्रणा नादुरूस्त झाल्याने अनेक ठिकाणचा संपर्काचाहीं मार्ग बंद झाला आहे असे ते म्हणाले. आमची यंत्रणा पोलिसांच्या मदतीने तसेच स्थानिक प्रशासनाच्या मदतीने आपदग्रस्तांची मदत करीत आहे असे ते म्हणाले. गेल्याच आठवड्यात पाकिस्तान व्याप्त काश्मीरातील चित्राल जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे.