नगर -करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रात्रदिंवस कर्तव्य बजाविणारे पोलीस, डॉक्टर, महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी व जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय पुरस्कृत जन शिक्षण संस्थेच्या वतीने चार हजार कापडी मास्कचे मोफत वाटप करण्यात आले.
रविवार (दि.5) रोजी जन शिक्षण संस्थेच्या वतीने पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, जिल्हा रुग्णालयाचे बापूसाहेब गाडे, जि. प. अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी बापूसाहेब नागरगोजे, महापालिकेचे उपायुक्त सुनिल पवार, उपजिल्हाधिकारी डॉ.रवींद्र बडदे तसेच नगर शहर, संगमनेर पोलीस ठाणे, महामार्ग पोलीस यांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार व कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद उपस्थित होते.
शहरातील जन शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालय दातरंगे मळा, कल्याण रोड शिवाजीनगर, कृष्णानगर, सिध्दार्थनगर, नालेगाव हडको या सेंटरच्या माध्यमातून महिला, युवती व युवकांना शिवणकामासह विविध व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. 2005 पासून जन शिक्षण संस्था कार्य करीत आहे. 30 हजार पेक्षा जास्त महिलांनी या संस्थेत व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहिल्या आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या महिला व युवती मास्क बनवून आपले योगदान देत आहे. हे मास्क बनविण्याचे काम पुढील तीन महिने चालू राहणार असून, करोनाशी लढा देण्यासाठी कर्तव्य बजाविणाऱ्यांना हे मास्क मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार यांनी दिली.
कविता वाघेला व कमल पवार यांच्या पुढाकाराने अजूनही कापडी मास्क बनविण्याचे काम सध्या सुरु आहे. या उपक्रमासाठी संस्थचे संस्थापक अध्यक्ष डॉ.राधेश्याम गुंजाळ, चेअरमन राहुल गुंजाळ, संचालक बाळासाहेब पवार, कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद, अनिल तांदळे, नंदेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.